अनोळखी चार जणांनी मध्यरात्री घरात घुसून मारहाण करत 1 लाख 61 हजारांचा ऐवज पळवला

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खटाव | खटाव तालुक्यातील विसापूर गावच्या हद्दीतील सावंत वस्ती येथे मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील चार जणांनी घरात झोपलेल्या एकाला मारहाण केल्याची घटना घडली. मोहन जयसिंग सावंत यांना मारहाण करून त्यांच्या शेतातील घरातून ७३०० रुपये व एक लाख ५४ हजार रुपयांचे दागिने असे एकूण एक लाख ६१ हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, मंगळवारी (ता. २५) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास विसापूरच्या हद्दीतील सावंत वस्ती येथे मोहन जयसिंग सावंत यांचे शेतात घर आहे. ते आपल्या शेतातील राहत्या घरात झोपले असताना २५ ते ३० वयोगटातील चार अनोळखींनी त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या बँकेच्या पुस्तकात ठेवलेली रोख रक्कम ५३०० रुपये व त्यांच्या पत्नीकडील रोख २००० रुपये, तसेच एक लाख ५६ हजार रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. यावेळी मारहाण करणाऱ्या एकाने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये त्यांची पत्नी पद्मावती यांच्या गळ्यातील चार हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, ९० हजारांचे कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन तोळ्यांचे गंठण, २० हजारांची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची चेन यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद मोहन सावंत यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी. बी. लोंढे करत आहेत.