औरंगाबाद – ज्युनियर केजीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय मुलाला मुख्याध्यापिकेने किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची तक्रार आईने दाखल केली आहे. शहरातील सिडको पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिडको एन-9 येथील रघुनंदन विद्यालयातील ही घटना आहे. मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांना मुलाचा धक्का लागल्यामुळे त्यांनी मुलाला रागवले आणि मारहाणही केल्याचा आरोप आईने केला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैजयंती महामुनी यांचा 4 वर्षीय मुलगा सिडको एन – 9 येथील रघूनंदन विद्यालयात शिकतो. आईच्या तक्रारीनुसार, 5 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मुलगा शाळेत होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांना मुलाचा धक्का लागला. एवढ्याशा कारणावरून त्या मुलाला रागावल्या आणि मारहाणही केली. घरी आल्यावर मुलाने हा प्रकार आईला सांगितला. आईने या प्रकरणी मुख्याध्यापिकेला शाळेत जाऊन विचारलणा केली असता त्या त्यांनादेखील उद्घटपणे बोलल्या, अशी तक्रार आईने केली आहे. एवढंच नव्हे तर मुलाचा दाखला काढून घ्या, असेही बजावल्याचे आईने तक्रारीत नमूद केले. त्यानंतर आईने मुख्याध्यापिका जोशी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
दरम्यान, मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. वर्गात मुलांची भांडणं सुरु होती, ती सोडवण्यासाठी मी गेले होते. त्यानंतर विराजने स्वतःलाच मारून घेत रडणे सुरु केले आमि घरी जाऊन मी मारले अशी तक्रार पालकांकडे केली, असं स्पष्टीकरण मुख्याध्यापिकेने दिले आहे. तसेच आजपर्यंत मी कुणालाही मारले नाही. कोणत्या मुलाला हातही लावलेला नाही. राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन ही तक्रार करण्यात आली आहे. उलट गेल्या चार वर्षआंपासून आम्हाला त्रास होत आहे. महामुनी यांनी त्यांच्या मुलाची फीसही भरलेली नाही. त्याशिवाय इतर मुलांची फीस कमी करण्यासाठी आमच्यावर वारंवार दबाव आणला जात होता, अशी तक्रार मुख्याध्यापिकेने केली आहे.