सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) चौकीचा आंबा तसेच तुपेवाडी येथे दोन वेगवेगळ्या कारवाई केल्या. पिस्तूल व दुचाकी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पिस्तूल प्रकरणात आणि दुचाकी चोरीत चाैघांना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपी कराड व खटाव तालुक्यातील आहेत.
पिस्तूल प्रकरणात विशाल संदीप भोसले (वय- 24, रा. औंध) व अक्षय प्रमोद हजारे (वय- 19, रा. औंध, ता. खटाव) यांना अटक करण्यात आली. चौकीचा आंबा येथे दोघांकडे बंदूक असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार तेथे सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये पोलिसांनी दोघांची झडती घेतली. या कारवाईत संशयितांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक दुचाकी, एक मोबाईल असा 1 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर दुचाकी चोरी प्रकरणात चोरीच्या दुचाकी परस्पर विकणाऱ्या दोन चोरट्यांना तुपेवाडी (ता. खटाव) येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. यामध्ये सोमनाथ शिवाजी जाधव (वय- 28, रा. फडतरवाडी, ता. खटाव) व सागर संजय शिंदे (वय- 27, रा. कापील, ता. कराड) अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना देऊन सतर्क केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना दुचाकी चोरी प्रकरणातील व्यक्ती तुपेवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुपेवाडी येथे सापळा रचून एका संशयितास जिल्हा परिषद शाळेच्या नजीक ताब्यात घेतले. सोबतच्या दुचाकी स्वाराने गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस हवालदार अमोल माने यांनी झडप घालून त्यास पकडले. सखोल चौकशी केली असता संबंधित दुचाकी त्याने आपल्या साथीदारांसह यशवंतराव चव्हाण ब्लड बँक सुपर मार्केट कराड येथून चोरल्याचे केले. एका साथीदारासोबत तीन दुचाकी चोरी केल्याचेही सांगितले.
पोलिस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, सहायक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, साबीर मुल्ला, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, मंगेश महाडिक, गणेश कापरे, सचिन ससाणे, अमोल माने, अमित झेंडे, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, केतन शिंदे, गणेश कचरे यांनी कारवाई केली.