लोअर दुधना धरणाचे चौदा दरवाजे उघडले; ‘या’ मार्गावरील वाहतूक ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी – सेलू तालुक्यातील लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला. धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळी साडेसहा ते मंगळवारी रोजी पहाटे दीड वाजेपर्यंत बारा दरवाजे, तर सकाळी आठच्या सुमारास विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चौदा दरवाजे उघडून ३० हजार ३२४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या चौदा दरवाजातून ३० हजार ३२४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याने सेलू-देवगाव (फाटा ) मार्गे औरंगाबाद, जिंतूरकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टी व मोठ्या विसर्गाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी तालुकाअंतर्गत मुख्य रस्ते व जोडरस्त्यावरील नदी, नाल्यांना, ओढ्यांना पूर आला आहे. येथील कमी उंचीच्या पुलांवर पाणी वाहत असल्याने सुमारे ५५ हून अधिक गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे.

नदीकाठच्या शेत जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात गेल्या २४ तासांत ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ५ हजार ४६४ क्युसेक्स दराने धरणात पाणी आले असून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत १३ हजार ३६७ दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री आठपासून दहा वाजेपर्यंत लाभक्षेत्रातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्के भरल्याने द्वार क्रमांक एक ते सात व चौदा ते ०.६० मीटरने उघडण्यात आली आहेत. त्या द्वारे ३० हजार ३२४ क्युसेक्स ( प्रति सेकंद ८ लाख ५८ हजार ४३२ लिटर ) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या सूत्रांनी दिली.

Leave a Comment