फसवणूक : ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसवेकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

फलटण | बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे, बरड तालुका फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण 15 जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि 15 जानेवारी 2018 रोजी बरड (ता . फलटण) गावचे हददीत बापुराव रामा लंगुटे (रा. बरड) यांचा पुतण्या गणेश विठठल लंगुटे व भाऊ विश्वनाथ रामा लंगुटे (दोन्ही रा. बरड ता. फलटण) यांनी त्यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1624 व मालमत्ता क्रमांक 1625 यांची नोंद करताना ग्रामपंचायत बरड यांना दिलेले 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर गट नं. 54 मधील इतर मिळकत धारक व बापुराव रामा लंगुटे यांच्या नावावर खोटया सहया व अंगठे करुन, बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन बरड येथे असणाऱ्या गाळयांची नोंद करण्याकामी ग्रामपंचायत बरड यांना 100 रुपयाचे संमतीपत्र व अर्ज, प्रतिज्ञापत्र दिले होते.

ग्रामपंचायत बरडचे तत्कालीन ग्रामसेवक दतात्रय सोपान भोसले (रा. घाडगेवाडी ता. फलटण) व दि. 16/1/2018 रोजीच्या मासीक मिटींग कामी हजर असणारे ग्रामपंचायतीचे सरंपच तृप्ती संतोष गावडे, उपसरपंच गोरख बबन टेंबरे, सदस्य सौ. माधुरी गणेश लंगुटे, प्रीतम विठठल लोंढे , रतन गुणवंत बागाव, गजानन रामदास गावडे, हेमलता हणमंत गावडे, कमल सुभेदार लोंढे, रुक्मीणी तुकाराम शिंदे, शेखर दिलीप काशिद, वनिता अण्णा लंगुटे, सचिन गजानन हाके (सर्व रा. बरड ता. फलटण) यांनी सर्वांनी आपआपसात संगणमत करुन बरड ग्रामपंचायती मध्ये गणेश विठठल लंगुटे यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1624 व विश्वनाथ रामा लंगुटे यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1625 या गाळयांची बेकायदेशीर नोंद घेण्यात आली असल्याची फिर्याद बापुराव रामा लंगुटे (वय- 62 वर्षे रा. बरड ता. फलटण) यांनी दिली आहे.