पुणे प्रतिनिधी | विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कमवा आणि शिका योजनेत १,६०० विद्यार्थी भोगास दाखवून ३ लाख ४६ हजारांचा भष्टाचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. २०१२ ते २०१९ या प्रदीर्घ काळात हा भ्रष्टाचार झाला आहे असे तपासातून उघड झाले आहे. या गुन्ह्यात तीन माजी विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशन तीन माजी विदयार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमोल भानुदास मगर ( रा. मारवाडी, ता. माळशिरस), सागर तानाजी काळे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) आणि किरण गायकवाड (रा.मुढाळे, ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत.
नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत हा अपहार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.दरम्यान यामध्ये विद्यापीठातील कर्मचारीही सहभागी असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्करराव जाधव यांनी दिली आहे.