कराडच्या एकाची साडेनऊ लाखाची फसवणूक : ऊस टोळीच्या मुकादमावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | ऊस तोडणीसाठी मजूर पुरवितो, असे सांगून मुकादमाने ट्रॅक्टर मालकाला साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातला. नुकताच हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणार्‍या मुकादमावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुभाष रामराव भोजने (रा. आंबेवडगाव, ता. धारुर, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे. याबाबत केसे (ता. कराड) येथील जनार्दन संपत पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बीड जिल्ह्यातील आंबेवडगावचा सुभाष भोजने हा 2019 साली केसे येथे कामास आला होता. त्यावेळी जनार्दन पाटील यांची त्याच्याशी ओळख झाली. जनार्दन पाटील यांचा ट्रॅक्टर असून ते त्याद्वारे ऊसाची वाहतूक करतात. 2021-22 साली ऊस तोडणीसाठी जनार्दन पाटील यांना मजुरांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी सुभाष भोजने याला फोन करुन मजूर मिळतील का, अशी विचारणा केली. त्यावेळी भोजने याने आठ कोयत्यांची म्हणजेच 16 मजुरांची टोळी पुरवितो, असे सांगितले. त्यासाठी त्याने 11 लाख रुपयांची मागणी केली. जनार्दन पाटील यांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन आरटीजीएस, रोख तसेच ऑनलाईनद्वारे त्याला 9 लाख 59 हजार 500 रुपये दिले. त्यानंतर 22 सप्टेबर 2021 रोजी त्यांनी पाथरी तालुक्यातील मानवत येथे जाऊन व्यवहाराबाबतची नोटरीही केली.

15 ऑक्टोबर 2021 पासून जनार्दन पाटील हे मजूर पाठविण्यासाठी सुभाष भोजने याला फोन करीत होते. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देत त्याने मजूर पाठविले नाहीत. तसेच दुसर्‍याच एका व्यक्तिचे नाव सांगून तो व्यक्ती तुम्ही दिलेले सगळे पैसे घेऊन पळून गेल्याचेही भोजने याने जनार्दन पाटील यांना सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जनार्दन पाटील यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली आहे. त्यावरुन सुभाष भोजने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Leave a Comment