हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमच्याकडे जर चारचाकी असेल आणि तुम्ही रोज हायवे किंवा एक्सप्रेसवर वरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. . रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहनधारकांच्या सुलभ प्रवासासाठी नवीन टोल प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार 20 किमीपर्यंत अंतरावर प्रवास करताना टोल (Free Toll) भरावा लागणार नाही. मात्र यासाठी तुमच्या गाडीमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सेटेलाइट सिस्टीम असणे आवश्यक आहे.
वाहनधारकांना मोठा दिलासा – Free Toll
देशात एकीकडे रस्त्यांचे जाळे दिवसेंदवस वाढत आहे तर दुसरीकडे गाड्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे टोल नाक्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते नाही प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळी पाऊले उचलली जातायत. GNSS सिस्टीम हा त्याचाच एक भाग आहे. GNSS ही एक प्रकारची उपग्रह प्रणाली आहे जी वाहनाच्या स्थानाबद्दल माहिती देते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये बदलांची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, तुम्ही कोणताही टोल न देता २० किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता. मात्र वाहनाने दररोज 20 किमीपेक्षा जास्त अंतर कापले तर त्याच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही हायवेवर 30 किलोमीटरचा प्रवास केला तर 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास टोल फ्री (Free Toll) असेल आणि तुमच्याकडून फक्त 10 किलोमीटरसाठीच टोल शुल्क आकारले जाईल. या नियमामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जुलैमध्ये सांगितले होते की काही निवडक महामार्गांवर लवकरच नवीन प्रकारची टोल टॅक्स प्रणाली वापरण्याचा प्रयत्न केला जाईल. हे ते GNSS तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान फास्टॅगसोबत काम करेल. म्हणजेच तुमच्याकडे फास्टॅग असला तरी तुम्ही हे नवीन तंत्रज्ञान वापरू शकता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी एक नवीन पद्धत आणली आहे, ज्यामुळे टोलनाक्यांवर वाहने थांबवण्याची गरज कमी होईल.