हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार थेट गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत (PHC) करण्यात आला आहे. आतापर्यंत ही योजना केवळ खासगी आणि मोठ्या सरकारी रुग्णालयांपुरती मर्यादित होती. त्यासाठी गरजू रुग्णांना लांबचा प्रवास करावा लागत होता. मात्र, आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच जखमेवर टाके घालण्यापासून ते किरकोळ शस्त्रक्रियांपर्यंतचे उपचार मोफत होतील. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब जनतेचा मोठा खर्च वाचणार आहे.
या योजनेचे थेट लाभार्थी ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि पात्र कुटुंबे असणार आहेत. खेड्यापाड्यातील रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी आणि ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली असून, सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार कवच देण्यात येणार आहे. गंभीर आजारांसोबतच आता छोट्या उपचारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत असून, तपासणी व उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे आता किरकोळ उपचारांसाठी किंवा छोट्या शस्त्रक्रियांसाठी ग्रामीण रुग्णांना शहरातील रुग्णालयांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावातच मोफत उपचार उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आरोग्य क्षेत्रात या निर्णयाने नवी क्रांती घडणार आहे.




