हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राज्यात कोरोनावरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र करोना बरोबरच म्युकोरमायकोसिस या नव्या विषाणूने कोरोना बाधित रुग्णांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. मात्र आता सरकारी रुग्णालयात म्युकोरमायकोसिस या रोगावर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “सरकारी रूग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत म्युकोरमायकोसिसवर उपचार मोफत केले जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. राज्यात आतापर्यंत 2000 हून अधिक या प्रकारच्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि या संसर्गामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांसाठी आम्ही विशेष वॉर्ड बनवत आहोत” अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
काय आहे म्युकोरमायकोसिस ?
कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत ‘म्युकोरमायकोसिस’ हे ‘फंगल इन्फेक्शन’ आढळत आहे. ते नवीन नाही; परंतु हल्ली कोरोनामुळे प्रतिकारशक्ती तसेच उपचारादरम्यान स्टिरॉईड्सचा मारा यामुळे अनियंत्रित मधुमेहातील रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार वाढत आहे. अनियंत्रित मधुमेह रुग्णांत ‘म्युकोरमायकॉसिस’मुळे मृत्यूचे प्रमाण ४०- ८० टक्क्यांपर्यंत असून घाटीतही या आजाराचे रुग्ण तक्रारी घेऊन येत आहेत. ‘फंगल इन्फेक्शन’मुळे काही रुग्णांची दृष्टी कमकुवत झाली. काहींमध्ये नाक आणि जबड्याचे हाड काढून टाकावे लागण्याचीही भीती आहे.
श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. वेगवेगळ्या अवयवांचे ते नुकसान करतात. ‘म्युकोरमायकोसिस’ मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा नाक डोळ्याला हळू हळू सूज येताच या ‘फंगल इन्फेक्शन’चे तात्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.