हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एखाद्या लग्न समारंभात आहेर म्हणून नववधू वराला महागड्या वस्तू, किंवा सोने- चांदीची भेट दिली जाते. मात्र आहेर म्हणून चक्क पेट्रोल दिल्याची घटना तामिळनाडू येथील एका लग्न समारंभात घडली आहे. ही अनोखी भेट पाहताच नव वधुवराला आश्चर्याचा धक्काच बसला मात्र या अनोख्या भेटवस्तूची चर्चा सोशल मीडियावर मात्र वाऱ्यासारखी पसरली.
चेंगलापट्टू येथील चेय्यूर गावात ग्रेस कुमार आणि किर्तना यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना आहेर म्हणून पेट्रोल, डिझेलची भेट देण्याची शक्कल लढवली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे आता लग्नातही ते भेट देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मात्र चाप बसला आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १२०.५१ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११५.०८ रुपये इतका असून चेन्नईत पेट्रोलचा भाव ११०.८९ रुपये इतका आहे