गुंजवणी ते विमानतळ, पुरंदरच्या विधानसभेला ‘हे’ मुद्दे निर्णायक ठरतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमानतळावरुन बरंच राजकारण झालं.. गुंजवणीचं पाणी बघता बघता घसा कोरडाच राहीला… आमदार आले.. बदलले… पण पुरंदरच्या समस्या तशाच राहील्या… बारामतीसारख्या पाणीदार तालुक्याला लागूनच असणाऱ्या पुरंदर विधानसभेला पाण्यावीना मात्र कोरडंच राहावं लागलं.. तालुक्याचा विकास कमी असला तरी मतदारसंघात राजकारणाला बरीच श्रीमंती आहे… दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव अशा डझनभर स्थानिक नेत्यांची नावं देता आली तरी इथलं मुख्य राजकारण चालतं ते दोन नावांभोवती… पहिलं संजय जगताप (Sanjay Jagtap) आणि दुसरं म्हणजे विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) … या दोघांच्यातला आमदारकीसाठीच्या खुर्चीचा विस्तव आपण पाहीला असेलच… विजयबापूंच्या राजकारणाला पाणी पाजत गेल्या टर्मला संजय जगतापांनी गेली विधानसभा खेचून आणलीच… यंदा विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यासमोर पुन्हा एकदा विरोधात विजबापू शिवतारेंचं चॅलेंज असणार आहेच. त्यामुळे पुरंदरात यंदा वारं कुणाच्या बाजूने फिरतंय… जगताप आणि शिवतारे यांची खरी ताकद किती? पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाण्याचा विधानसभेवर कसा प्रभाव पडेल? पुरंदरचा यंदा आमदारकीच्या गुलालाचा मानकरी कोण? याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट…

विजयबापू पुरंदरच्या राजकारणातील सुरवातीला वन मॅन शो.. राजकारण करायचं तर फक्त शिवतारेंनी ही लाईन मतदारसंघात पक्की झाली होती.. २००९ आणि २०१४ ला सरळ सरळ संजय जगतापांचा पराभव करत विजयबापू बिग फिश बनले होते. २०१४ नंतरच्या मंत्रीमंडळात तर थेट जसलंपदा मंत्रीचं राज्यमंत्रीपद मिळाल्यानं पुरंदरकरांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या.. शिवसेनेचा आणि त्यातही शिवतारेंना मानणारा एक स्ट्राँग केडर बेस त्यांनी तयार केला आणि वाढवला.. पण या सगळ्यात निर्णायक ठरला तो गुंजवणीचा पाणीप्रश्न… खरंतर अनेक आश्वासन देऊनही आणि त्यात त्याच खात्याचं मंत्रीपद असूनही शिवतारेबापूंना गुंजवणीचा पाणी प्रश्न निकाली काढता आला नाही.. थोडक्यात जनतेच्या मनात प्रचंड नाराजी होती. त्याचं उत्तर २०१९ च्या निकालात जनतेनं दाखवून दिलं. आणि शिवतारेंना बाजूला सारत जनतेनं संजय जगतापांना निवडून दिलं…

YouTube video player

जगतापांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीकडे पाहीलं तर म्हणावं असं मोठं काम त्यांनीही केलं नसलं तरी मतदारसंघात छोटीमोठी कामं त्यांच्यामार्फत झाली आहेत.. त्यात लोकांच्या मर्जीशिवाय पुरंदर विमानतळ होऊ देणार नाही, हा घेतलेला स्टँड जगतापांना फायद्याचा राहीला..फक्त सरकारनं पाणी नाही आणलं तरी मी माझ्या पैशावर पाणी आणीन, असं निवडणुक प्रचारात आत्मविश्नासानं सांगणाऱ्या जगतापांना हा शब्द काही पाळता आलेला दिसत नाहीये.. पण मतदारसंघातली जनता आता या गुंजवणीच्या पाण्याला कंटाळली आहे.. लोकांनी हे पाणी मिळेल, अशी अपेक्षाच या राजकारणी मंडळींमुळे सोडून दिली आहे. गुंजवणीची द्राक्ष आंबट असं म्हणत काही अपवाद वगळता जनतेनं स्वत: ला एडजस्ट करुन घेतलंय. थोडक्यात ज्या गुंजवणीच्या आणि विमानतळाच्या प्रश्नावर मागची १५ वर्ष राजकारण झालं ते प्रश्न येत्या विधानसभेला मात्र जास्त प्रभाव टाकणार नाहीत, अशी अवस्था सध्या मतदारसंघाची होऊन बसलीय…

पण करंट स्टेटसमध्ये पाहायचं झालं तर लोकसभेला जगतापांनी तुतारीला मतदारसंघातून लीड मिळवून दिलंय… त्यामुळे यंदाही जगतापांच्या बाजूने वातावरण असल्याचा अंदाज बांधता येऊ शकतो तर दुसरीकडे शिवतारे बापूंनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिल्यानं मतदारसंघातील शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा कोअर गट फुटला… त्यात बापूंचे अनेक निष्ठावंतांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली.. हे कमी होतं की काय म्हणून लोकसभेला केलेल्या नाराजीनाट्यामुळे आणि बदललेल्या भूमिकांमुळे बापूंना याचा मेजर सेट बॅक बसणार असल्याचं सध्यातरी दिसतंय.. तर दुसरीकडे विद्यमान आमदार जगतापांच्या पाठीशी संस्थात्मक ताकद मोठी आहे.. त्यात आघाडीच्या घटक पक्षांची मतदारसंघातील ताकद पाहता जगतापांच्या पाठीशी यंदाच्या निवडणुकीलाही मोठा बॅकअप राहणार आहे… जगताप यांनी निवडणुकी आधी स्वतची जशी प्रतिमा तयार केली होती तितकी काम या पंचवार्षिकला करता आली नसली तरी आपली प्रतिमा स्वच्छ आणि मतदारसंघात बेरजेचं राजकारण केल्याने यंदाही आमदार जगतापच राहतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे…

सध्या महायुतीच्या बाजूने अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे ही नेतेमंडळी असली तरी त्यांचा मतदारसंघातील प्रभाव ओसरता राहीलाय.. त्यात भाजपमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीचा फटका जगतापांच्या पथ्यावर पडणाराय… तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉंग्रेसमध्ये अशी गटबाजी आढळत नाही, इथे पूर्ण पक्ष हा जगतापांच्या कंट्रोल खाली आहे… शरद पवार गटात गटबाजी दिसते खरी पण त्याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसेल, हे सध्यातरी वाटत नाही..थोडक्यात पुरंदरच्या राजकारणाला ३६० अंशात बघीतलं तर जगताप सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा गुलाल उधळतायत, असं वातावरण आहे.. पण पुरंदर विमानतळाचं काय? गुंजवणीचं पाणी आता ती तालुक्याला मिळणार का? राष्ट्रीय बाजार बनवण्याच्या स्वप्नाचं काय? या जनतेच्या मागण्या आणि समस्यांकडे जगताप आणि शिवतारेंनी थोड्या माणुसकीच्या नजरेनं बघायला हवं एवढीच काय ती अपेक्षा..बाकी पुरंदरचा आमदार म्हणून तुम्हाला यंदा कुणाला पाहायला आवडेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..