करमाळा ते माळशिरस…. सोलापुर जिल्ह्यात विधानसभेला या 5 मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात… राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकत असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला चित्र नेमकं कसं असेल? शहाजी बापू पाटील, राम सातपुते, समाधान अवताडे यांसारख्या आमदारांची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का? जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे कुणाचे जास्त चान्सेस आहेत? त्याचाच घेतलेला हा आढावा…

यातला पहिला मतदारसंघ येतो तो करमाळ्याच्या…

करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे… राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या संजय मामांनी 2019 ची निवडणूक मात्र अपक्ष लढवली होती… त्याचं मुख्य कारण होतं ती म्हणजे इच्छुकांची भाऊ गर्दी आणि लोकसभेला झालेला पराभव… 2019 चा विचार करता करमाळ्यात आमदारकीसाठी मोठी उलथा पालथ पाहायला मिळाली… राष्ट्रवादीत असणाऱ्या रश्मी बागल यांनी शिव धनुष्य हातात बांधत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली… तर राष्ट्रवादीकडून संजय पाटील यांच्या नावावर तिकीट वाटपाच्या चर्चेत मोहोर उमटली… त्यामुळे अपक्ष म्हणून माजी आमदार नारायण पाटील आणि संजय मामा शिंदे या मातब्बरांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला… अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांना बाजूला सारत अपक्ष संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार झाले…अर्थात त्यांचं मूळ राष्ट्रवादीचं असल्याने ते पक्षासोबतच राहिले… पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांचा हात धरल्याने विधानसभेला ही जागा कुणाला सुटणार? यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे… रश्मी बागल, संजय शिंदे हे दोघेही उमेदवारीसाठी स्पर्धेत असले तरीदेखील लोकसभेला मोहिते पाटलांना मिळालेलं मताधिक्य पाहता करमाळ्यात आमदारकीचा खांदेपालट होण्याची शक्यता आहे… त्यात तुतारीकडून नारायण पाटील यांची उमेदवारी फिक्स समजली जातेय. लोकसभेतील विजयामुळे नारायण पाटलांना मिळणारा मोहिते पाटलांचा अप्पर हॅन्ड आणि शरद पवारांची ताकद पाहता येणाऱ्या विधानसभेत नारायण पाटील जायंट किलर ठरण्याची शक्यता आहे…

YouTube video player

दुसऱ्या मतदारसंघ आहे माढ्याचा…

माढ्यातून अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन दादा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत…मोहिते पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या शिंदे बंधूंच्या याच माढा विधानसभेतून तुतारीला तब्बल पन्नास हजार हून जास्तीचं लीड मिळालं… त्यामुळे मोहिते पाटील आता रिव्हर्स बॉल टाकून ‘माढा आणि बबन दादांना पाडा’ असा स्टॅन्ड विधानसभेला घेऊ शकतात… त्यामुळे सहा टर्मचे आमदार असणाऱ्या ज्येष्ठ आमदार बबनदादांची आमदारकी आता धोक्यात येणारय… बबनदादा शिंदे हे यावेळी निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चा आहेत. गेले काही दिवस तब्येतीचा त्रास सुरु झाल्याने यावेळी ते त्यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे याना उभे करू शकतात. तर दुसरीकडे माढा विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन मातब्बर उमेदवार सध्या इच्छुक असून धनगर समाजाचे शिवाजी कांबळे यांचंही नाव चर्चेत आहे… त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी नुकतीच घेतलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीने त्यांच्या नावाचीही उमेदवारीसाठी चर्चा होऊ लागलीये… शरद पवार गटाकडून तिकीट कोणाला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी शिंदेच्या वर्चस्वला येणाऱ्या विधानसभेला सुरुंग लागण्याची शक्यता जास्त आहे…

तिसरा मतदार संघ येतो तो माळशिरसचा…

मोहिते पाटलांचा बालेकिल्ला म्हणजे माळशिरस…इथं मोहिते पाटील ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात तो निवडून येतो असं बोललं जातं…वर्षानुवर्षे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून हनुमंतराव डोळस हे सलग दोनवेळा विजयी झाले. अर्थात मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने ते निवडून येत होते…पण 2019 च्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात मोठा फेरफार पाहायला मिळाला.. हनुमंतराव डोळस यांचं निधन झालं… त्यात स्वतः मोहिते पाटील भाजपवासी झाल्यामुळे इथून महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे कन्फर्म झालं… राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर यांची उमेदवारी कन्फर्म झाली… मात्र मोहिते पाटील असूनही महायुतीचा उमेदवार कोण? याचा निर्णय होत नव्हता… पण अगदी झिरो मोमेंटला फडणवीसांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राम सातपुतेंना तिकीट मिळालं… आणि निसटत्या लीडने का होईना, पण ते निवडून आले…सद्यस्थितीचा विचार केला तर सातपुते सोलापूरचे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत…मोहिते पाटलांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत… स्वतः उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांचा खांद्याला खांदा लावून प्रचार केल्यामुळे त्यांनाच माळशिरसची उमेदवारी मिळण्याची आणि विजयाची शक्यता जास्त आहे… प्रश्न फक्त उरतो राम सातपुते लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेला उतरण्याची हिंमत दाखवणार का?

चौथा मतदारसंघ आहे तो सांगोल्याचा…

काय झाडी…काय डोंगर…काय हॉटेल…. फेम शहाजी बापू पाटील सांगोल्याचे आमदार… पण ते ही योगायोगाने बनलेल्या दुसऱ्याच टर्मचे… कारण शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचा हा अभेद्य बालेकिल्ला राहिला…60 वर्षे एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघानं 2019 मध्ये नवा इतिहास रचला… कारण परमनंट आमदार म्हणून ओळख असणाऱ्या विधिमंडळातील भीष्माचार्य गणपतराव देशमुख यांनी 2019 ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला… त्यामुळे त्यांचे पारंपारिक विरोधक शहाजी बापू पाटील यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या… यावेळेस गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली खरी… पण अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत शहाजी बापूंचा अवघ्या 674 मतांनी विजय झाला…आणि शेकापच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकला…येणाऱ्या विधानसभेला वारं शहाजी बापूंच्या विरोधात असल्याचं बोललं जातंय… शिवसेनेतील बंड, महाविकास आघाडीवर केलेल आरोप, विवीध वायरल भाषण आणि मोहिते पाटलांना खासदारकीला शिंगावर घेतल्यानं शहाजी बापूंची क्रेझ बरीच झाली… पण प्रॉपर सांगोल्यात त्यांच्या विरोधात वातावरण असल्यानं सांगोल्यात येणाऱ्या काळात शेकाप चा आमदार पाहायला मिळतो? की काँग्रेस राष्ट्रवादीचा? हे येणाऱ्या काळात क्लिअर होईलच…

पाचवा मतदार संघ आहे पंढरपूरचा…

पंढरपुरात 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकरराव परिचारक यांना धूळ चारत भारत भालके यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली… 2009 ला दस्तूरखुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांना मात देणारे भालके जायंट किलर ठरत आमदार झाले… आणि गटातटाच्या राजकारणाला भेदत त्यांनी सलग तीन टर्म आमदार होण्याचा बहुमान मिळवला…मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक लागली… या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहानुभूतीच्या फॅक्टरचा विचार करत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊ केली… तर भाजपने समाधान आवताडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं… अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत मात्र समाधान आवताडे यांनी गुलाल उधळत पंढरपुरात कमळ फुलवलं…पण लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45 हजारांच्या लीडने आता समाधान आवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे… महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत… त्यामुळे गटतट जोडून घेणं, दांडगा जनसंपर्क, मतांची गोळा बेरीज करण्यात ज्याला यश येईल, तो इथला आमदार अशी सध्याची परिस्थिती आहे… बाकी लोकसभेला मिळालेल्या लीडमुळे प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ द्यावं लागणार आहे, एवढं मात्र निश्चित…यासोबत सोलापुरात शहरातील सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण या सोबतच अक्कलकोट, मोहोळ आणि बार्शीचाही समावेश होतो… पण या विधानसभांचा आढावा आपण नंतर सविस्तर व्हिडिओतून घेऊच…