सर्वसामान्यांचा नेता ते हॅट्रिक आमदार ; जाणून घ्या भारत भालकेंची कारकीर्द

सोलापूर । पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी चर्चा सुरु झाली आहे. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावरच विधीमंडळाच्या सदस्यत्वाची म्हणजेच आमदारकीची हॅटट्रिक मारली. त्यांची ओळख जनसामान्यांचा नेता अशीच राहिली. त्यांनी तालुक्याच्या राजकारणात 1992 मध्ये सक्रिय सहभाग घेतला.

ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही निवडून आले. तेथून सुरु झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पुढे ते 2002 मध्ये याच कारखान्याचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून आजपर्यंत अध्यक्षपद राखत त्यांचंच या कारखान्यावर वर्चस्व राहिलं.भारत भालके सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले.

2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं. आणि ते हट्रिक करत निवडूनही आले होते. मात्र त्यांच कोरोनाने निधन झाल्याने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like