हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील (Panhala Fort) शिवस्मारकाच्या उभारणीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज नगरविकास विभागाच्या माध्यमातून हा निधी मंजूर केलाय. याबाबतीतला शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो या आमदारांना सुपूर्द करण्यात आला. एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे पन्हाळा किल्ल्यावर छत्रपतींचे स्मारक असावे अशी इच्छा बाळगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि लाखो शिवप्रेमींची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पन्हाळा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वतः महाराजांनी या किल्ल्यावर 133 दिवस वास्तव्य केले होते. तसेच सिद्धी जोहरने टाकलेला पन्हाळ्याचा वेढा असेल, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने दिलेले बलिदान असेल किंवा त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य असेल असे ऐतिहासिक महत्त्व या किल्ल्याला आहे. मात्र तरीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नसल्याने याठिकाणी शिवस्मारक व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींचे स्मारक असावे ही मागणी पहिल्यांदा करण्यात आल्यानंतर त्यावेळेसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला होता.
पन्हाळा किल्ल्यावरील तळ्याच्या मध्यभागी चौथरा बांधून त्यात हे स्मारक उभारण्यात येणार होते. मात्र काही कारणांमुळे शिवस्मारकाचे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. अखेर कोल्हापूरचे आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबीटकर यांनी आता पुन्हा या मागणीचा पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला यश आलं. आणि आता एकनाथ शिंदे यांनी पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच नगरविकास विभागाकडून तत्काळ तसा जीआर काढून हा जीआर या आमदारांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.