सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कुपवाड येथे नियोजित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेवरून कुपवाडमधील नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे अद्याप हॉस्पिटलच्या कामाला सुरूवात झाली नाही. शासनाने हॉस्पिटल उभारणीसाठी सप्टेंबर २०१९ अखेरची डेडलाईन दिली आहे. अन्यथा पाच कोटींचा निधी परत जाण्याचा धोका व्यक्त केला आहे. त्यामुळे हॉस्पिटलच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
महापालिकेत तत्कालिन कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना राष्ट्रीय शहरी अरोग्य अभियानार्ंगत २०१४-१५ मध्ये कुपवाडला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. वारणालीतील विद्यानगर येथील १९१/अ/१+२ सर्व्हे क्रमांकाच्या जागेवर शासनानेच शिक्कामोर्तब केला आहे. यासाठी अंदाजपत्रक आणि आराखडाही तयार झाला होता. परंतु त्यानंतर वेळेत हे काम झाले नाही.महापालिकेत आता सत्ता परिवर्तन झाले. भाजपची सत्ता आल्यानंतर जागेवरून वाद सुरू झाला आहे. भाजप सत्तेत सर्वपक्षीय दोन गटात वाद रंगला आहे. यामध्ये एका गटाने या जागेत बदल करून ते कुपवाड गावठाणलगत न्यावे असा अट्टाहास धरला आहे. त्याबाबत जनसुनावणी, आयुक्तांसमोर बैठकांनंतरही तोडगा निघाला नाही.
आयुक्तांनी दोन्ही ठिकाणी स्वतंत्र हॉस्पिटल उभारू, अशी सूचना केली. त्यालाही मान्यता दिली नाही. त्यामुळे आता हा चेंडू महासभेकडे ढकलण्यात आला आहे. परंतु आयुक्त नितीन कापडनीस यांनी कुपवाडजवळ वाघमोडेनगरमध्ये नव्याने जागा खरेदीसाठी 2 कोटी रुपये खर्च करावा लागेल असे स्पष्ट केले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. तसेच जागा खरेदी केल्यास सदस्यांवर वसुली लागेल असा इशाराही देत महासभेत निर्णयासाठी विषय ढकलला आहे. आता महासभेत या जागेचा पुन्हा वाद रंगणार आहे. प्रसंगी यातून जागाबदलाचा निर्णय झाला तर वाद न्यायालयात अडकणार आहे. परंतु शासनाच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत हॉस्पिटल उभारणी लांबल्याने आयुक्त व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान नाराजी व्यक्त केली आहे. सप्टेंबर २०१९ अखेर हा निधी खर्च झाला नाही तर तो निधी शासनाकडे परत पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे हॉस्पिटलच्या अडचणीत वाढ झाली आहे.