कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्य शासनाच्या जलजीवन मशीन कार्यक्रम 2021-22 मधून कराड तालुक्यातील उंडाळे -येळगांव जिल्हा परिषद गटातील म्हासोली, येणपे,व येवती येथील नळ पाणीपुरवठा योजनांच्या सुधारणेसाठी तब्बल 3 कोटी हून निधी मंजूर झाला आहे. निधी मंजुरीसाठी जिला परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, उंडाळे जि. प. गटातील डोंगरी भागातील म्हासोली,येवती, येणपे गावासाठी जुन्या पाणी पुरवठा योजना होत्या. या योजनेच्या सुधारणेसाठी निधीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर कराड पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने या बाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. त्यास सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
म्हासोली नळपाणी पुरवठा योजनेस 1 कोटी 88 हजार, येणपे, शेवाळेवाडी,चोरमारवाडी नळपाणी पुरवठा योजनेच्या सुधारणेसाठी 67 लाख तर येवती नळपाणी पुरवठा योजनेच्या सुधारणेसाठी 1 कोटी 38 लाख असा एकूण 3 कोटी हून अधिक निधी मंजूर झाला आहे. येवती योजनेसाठी लोकसंख्या कमी व योजनेसाठी आवशयक खर्च जास्त येत असल्याने पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून वाढीव निधीस जि प सदस्य उदयसिंह पाटील यांचे प्रयत्नातून निधी मिळाला आहे. पेयजलमधून निधी मंजूर झालेबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जि प सदस्य ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर ,माजी सभापती फरीदा इनामदार व पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.
याबाबत माहिती देताना उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले की, पेयजल मधून यापूर्वी घोगांव,येळगांव,साळशिरंबे योजनेस निधी मंजूर झाला आहे. उंडाळे प्रादेशिक योजने मध्ये ओंड, उंडाळे, मनव, जिंती, आकाईचीवाडी या गांवचा या पूर्वी समावेश असल्याने पेयजल योजनेचा निधी मंजुरीस अडचण येत आहे. विशेष बाब म्हणून या योजनांना निधी मिळावा यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून यासाठी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.