सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा तालुक्यातील वर्णे येथील सुपुत्र जवान नायब सुभेदार श्रीमंत काळंगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना वर्णेसह परिसरातील ग्रामस्थांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. जवान नायब सुभेदार श्रीमंत सुरेश काळंगे (वय ४२) हे सियाचीन येथे सैन्यदलात १२ मराठा लाइट इंनफन्टी बटालियन मध्ये एनएसजी कमांडो मध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होते.
शुक्रवारी पाहटे त्यांचे अल्पशा आजाराने सियाचीन येथे उपचारादरम्यान निधन झाले. काळंगे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गांव शोक सागरात बुडाला. काळंगे यांचे पार्थिव आज सकाळी साडेसात वाजता गावात आणण्यात आले. पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात आले. पार्थिव पाहताच आई यशोदा, पत्नी वैशाली, मुलगा सुजित व सचिन,भाऊ विनायक व लक्षमण या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
काळंगे यांचा पार्थिव फुलांनी सजववलेल्या ट्रँक्टरच्या ट्रॉलीत ठेवण्यात आले. अंत्ययात्रा दरम्यान पार्थिवावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी फुलांची वृष्टी करण्यात आली. या अंत्ययात्रे दरम्यान श्रीमंत काळंगे यांच्या नावाचा ग्रामस्थांनी जयघोष केला. भारत माता की जय!, जब तक सुरज चांद रहेगा, तब तक श्रीमंत तेरा नाम रहेगा, वंदे मातरम, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर १२ बटालियनचे सुभेदार एस. एस. शिखरे, सैनिक कल्याण कार्यालयाचे ऑर्डनरी कँप्टन गोरखनाथ जाधव, प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सुनिल मुनाळे, बोरगांव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, धनंजय शेडगे, विश्वास शेडगे, संतोष कणसे, सरपंच विजय पवार आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांचे वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.यावेळी वर्णेसह परीसरातील नागरिक उपस्थित होते.