कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
विद्यार्थिनींनी ठराविक चाैकटीत न राहता वेगवेगळ्या कला आत्मसात कराव्यात. आपले जीवन जगत असताना, त्या कलांचा आपल्या जीवनात अवलंब करावा. पुस्तके वाचून अनुभव समृद्ध व्हावे. तसेच ज्ञान सातत्याने मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन हॅलो महाराष्ट्र न्यूजचे संपादक आदर्श पाटील यांनी केले.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित कन्याशाळा मलकापूर येथे विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श पाटील हे बोलत होते. यावेळी महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक रघूनाथ कळके, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट, संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक अजित थोरात, दिनेश रैनाक, आबासाहेब सोळवंडे, हॅलो महाराष्ट्रचे प्रतिनिधी सकलेन मुलाणी, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, भास्करराव मोहिते, अनिल शिर्के, दिलीप थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी तसेच श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी, क्रीडा व इतर बाह्यस्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख सौ. जयश्री पाटील, सौ. वनिता येडगे यांनी केले. आभार पर्यवेक्षक सुरेश राजे यांनी मानले. यावेळी यशस्वी विद्यार्थिनींचे पालक, शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.