Wednesday, October 5, 2022

Buy now

गमेवाडी नळपाणी पुरवठा योजनेची चाैकशी व्हावी : रूपाली पवार

पाटण | पाटण तालुक्यातील गमेवाडी येथे झालेली विकासकामे व नळपाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारण्यापूर्वी संबंधित विभागाने चौकशी करावी, अशीही मागणी पंचायत समिती सदस्या रूपाली पवार यांनी सभागृहात केली.

सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी जि. प. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, उपसभापती प्रतापराव देसाई, सहायक गटविकास अधिकारी विजय विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती.

जलजीवन मिशन आराखड्यात पाटण तालुका मागे असून त्याला गती मिळणे गरजेचे असल्याचे शेलार यांनी सांगितले. यावर शाखा अभियंता एम. आर. कदम यांनी सातत्याने होणाऱ्या आढावा बैठका, घरकुल सर्व्हे, कमी मनुष्यबळ व गावांची संख्या जास्त असल्याने कामाला गती मिळत नसल्याचे सांगितले.

गमेवाडीतील ग्रामसेवकांच्या चौकशीचे काय झाले, असे सभापती शेलार यांनी विचारले. यावर पुन्हा रूपाली पवार आक्रमक होऊन या कामांबाबत कागदपत्रेच उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर सभापती शेलार यांनी तातडीने याची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. तर 2 कोटी 40 लाखांचा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्ची झाला नसल्याबावत सभापती शेलार यांनी विचारणा करत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.