गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड- खासदार संजय राऊत

मुंबई । गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड असून राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राहुल गांधींशी आमचे चांगले संबंध आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधारकार्ड आहे. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी मागणी कोणी करत असेल तर ती तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. गांधी परिवाराबाहेरचे कुणी दिसत नाही, की जे पक्षाला पुढे घेवून जातील. राहुल गांधींनी उत्तम नेतृत्व केल्यानेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये सत्ता मिळाली. राहूल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं, राऊत म्हणाले.

आजही काँग्रेस एक प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण सध्या काँग्रेसची ताकद क्षीण झालीय हे खरं आहे. त्यांनी अंतर्गत मतभेद संपवायला हवेत. त्यांनी स्वत:ला सावरायला हवं. गावागावात कार्यकर्ते असलेला हा पक्ष आहे. वड्डेटीवार यांना जे वाटत आहे, ते राहुल गांधी यांच्या मनात नाही. राहुल गांधी यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. राहुल गांधी हे महाविकासआघाडी सरकार उत्तम चालावे या मताचे, असल्याचंही राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”