‘लालबागचा राजा’ मंडळाचा ऐतिहासिक निर्णय; गणेशोत्सव रद्द करत आरोग्योत्सव साजरा करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या साथीचे संकट आणि राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे कोरोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.श्री गणेश मूर्तीची स्थापनाच होणार नसल्यामुळे यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला कोट्यवधी भाविकांना मुकावं लागणार आहे.

मुंबईतील गणेश गल्ली येथील ‘मुंबईचा राजा’ मंडळानंही यंदा उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळानं आगमन मिरवणूक सोहळा व पाटपूजन सोहळा रद्द केला आहे. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक मोठ्या मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत. ‘लालबागच्या राजा’ मंडळानं त्याही पुढं जाऊन उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं ‘लालबागचा राजा’ यंदा भक्तांना अगदी वेगळ्या रूपात दर्शन देणार हे स्पष्ट झालं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८७ वे वर्ष आहे.

असा साजरा होणार लालबागच्या राजाचा आरोग्योत्सव

गणेशमूर्ती न बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब!

११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार..

करोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान

गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझमा थेरपी शिबिरं राबवण्यात येणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment