हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून गांजाची (Marijuana) मोठी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 20 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. ॲमेझॉनवर कडीपत्ता दाखवून त्याजागी गांजाची विक्री केली जात होती. पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली आहे.
मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी शनिवारी ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (30) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर (35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोपींनी गांजा तस्करीसाठी ॲमेझॉनवर बनावट पॅनकार्ड आणि जीएसटी क्रमांकासह नोंदणी केली होती. ॲमेझॉनद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा याशिवाय इतर अनेक भागात गांजाची विक्री केली जात होती. ॲमेझॉनसारख्या प्रसिद्ध शॉपिंग वेबसाईटबाबत असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.