हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातुन एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गणपतीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चक्क गणपतीची मूर्ती ताब्यात घेतल्याचा फोटो व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या अनोख्या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्नाटकातील पोलिस कारवाईव्यतिरिक्त महाराष्ट्रातील हिंदू समाजात सुद्धा प्रशासनाबाबत निराशेची लाट आहे. धार्मिक कार्यक्रमात देवाची मूर्ती जप्त केल्याचे चित्र भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे.
खरं तर गणपती बाप्पा हिंदूंचे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला हिंदू समाजात मोठं स्थान आणि मान आहे. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपतीच्या आरतीला हजेरी लावली, त्यावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीनेही टीका केली होती. मात्र या सगळ्यातच कर्नाटकातील गणपती बाप्पाच्या मूर्ती जप्त केल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. कर्नाटकात काँग्रेसशासित सरकार आहे. त्यामुळे हिंदू संघटना आणि संपूर्ण समाज या एकूण प्रकरणावर चांगलाच आक्रमक झाला.
भाजपचा काँग्रेसला आरसा –
2009 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि केजी बालकृष्णन सरन्यायाधीश होते. मनमोहन सिंग यांनी सरकारी निवासस्थानात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात सरन्यायाधीशही उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या गणपती आरतीवर आक्षेप घेणारे विरोधकांना मनमोहन सिंग आणि बालकृष्णन यांच्या घटनेचा विसर पडला का? असा सवाल भाजपकडून केला जात आहे.
मात्र जस दिसतंय तस अजिबात नाही… गणपती बाप्पाची मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली नसून मूर्तीच्या सुरक्षतेसाठीच पोलीस गाडीत ठेवण्यात आली होती. माहितीनुसार, कर्नाटकातील मंड्या येथे गणेश विसर्जन दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलकांचा एक गट बेंगळुरूच्या टाऊन हॉलसमोर निदर्शने करत होता. हे आंदोलक गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील गणेशमूर्ती काढून पोलीस व्हॅनमध्ये ठेवली. नंतर या मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. याबाबत बेंगळुरूचे डीसीपी सेंट्रल शेखर आरएच टेकनवार यांनी म्हंटल कि, लोकांचा एक गट उच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध करत होता आणि यावेळी त्यांच्यासोबत गणपतीची मूर्तीही होती. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण विधीपूर्वक गणेशमूर्तीचे विसर्जन केले.