Thursday, March 23, 2023

शेळीपालनासाठी महाराष्ट्र सरकारची ‘गोट बॅंक’ योजना; जाणून घ्या काय आहे ‘ही’ संकल्पना आणि याचे फायदे!

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।  कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते.  शेळीपालनातून उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याने डोंगराळ भागातील अदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी शेळीपालनाला विशेष प्राधान्य देतात. हीच बाब ध्यानात घेत शासनाने जास्तीत शेतकरी महिलावर्गाला यातून रोजगार मिळावा या उद्देशाने ‘गोट बँक’ हा उपक्रम सुरू केला आहे. शासनाने  गोट बँक हा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमच्या माध्यमातून सुरू केला आहे. सध्या प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम अकोला आणि अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येणार  आहे

‘गोट बँक’ उपक्रमासाठी राज्य शासनाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी, अकोला यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. दरम्यान माविमच्यावतीने सुरू करण्यात येत असलेला गोट बँकेचा उपक्रम अतिगरीब महिलांच्या आर्थिक  सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. शेळीपालनातून होणाऱ्या कमाईतून चलन फिरते.  या व्यवसायामुळे चलन फिरते राहिल्यामुळे  उपजीविकेला हातभार लागण्यासह जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

काय आहे गोट बॅंक संकल्पना?गोट बँक उपक्रमांतर्गत माविमच्या महिला बचत गट सदस्यांना नाममात्र प्रक्रिया शुल्क आकारून प्रत्येकी एक शेळी वितरित करण्यात येणार आहे. या शेळीच्या पहिल्या चार वेतातून ४ पिल्ले गोट बँकेला परत केल्यानंतर ही शेळी पुर्णतः संबंधित महिलेच्या मालकीची होणार आहे. गोट बॅंकेकडे आलेली पिल्ले पुढे दुसऱ्या महिला सदस्यांना देखील अशाच पध्दतीने देऊन त्यांचे संगोपन केले जाणार आहे. शेळ्या १ पेक्षा अधिक पिल्ले देत असल्याने त्यांच्या उर्वरित पिलांचे संगोपन करून त्यातून मिळणारा नफा हा लाभार्थी महिलांना घेता येणार आहे.