औरंगाबाद | पर्यावरणाचची वाढती हानी लक्षात घेऊन औरंगाबाद मनपा प्रशासनाने आता शहरात आणखी सात ठिकाणी गॅस शवदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या शवदाहिनी आणि मोबाईल टेस्टींग लॅब व्हॅन खरेदी करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव मनपाच्या वतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराचा मृत्यूदर वाढला होता. याकाळात अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत मृतदेहाच्या रांगा लागत होत्या. याशिवाय बहुतांश वेळा अंत्यसंस्कारासाठी लाकडे मिळणेही कठीण झाले होते. तसेच यामुळे पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे शहरात विद्यूत व गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. यातुनच शहरातील कैलासनगर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी औरंगाबाद फर्स्ट या संघटनेने पुढाकार घेतला. सद्यस्थितीला ही शवदाहिनी उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. यानंतर मनपाने शहरातील सिडको एन ६, पुष्पनगरी व सिडको एन ११ येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तसा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. परंतु आता पर्यावरणाचा विचार करून शहरात सात ठिकाणी गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी १२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव मनपाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.
कुठे होणार गॅस शवदाहिनी –
पुष्पनगरी, सिडको एन ११, मुकुंदवाडी, भावसिंगपुरा, कैलासनगर (अतिरिक्त), सातारा परिसर याठिकाणी गॅस शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. एका गॅस शवदाहिनीसाठी एक कोटी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.