औरंगाबाद प्रतिनिधी । ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४ वर्षे) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास येथून अटक करण्यात आली. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून तो नाव बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, ऋषिकेशचे औरंगाबाद वास्तव्यातील पतंजली कनेक्शन आता समोर येत आहे.
ऋषिकेश अडीच वर्ष औरंगाबादेतील सिडको-एन ९ भागात पतंजलीचे दुकान चालवत होता. ऋषिकेश सन २०१४ ते २०१६ या कालावधीत सिडकोमध्येच यशवंत शुक्ला यांच्या एल-४४ या घरात आई,वडील आणि पत्नी, मुलगीसोबत राहत होता. ऋषिकेशचे नेहमी सोलापूरमध्ये जात असे. तेथे तो विद्यार्थ्यांची ट्युशन घ्यायचा. ट्युशन क्लासेसमुळं क्वचितच औरंगाबादेत राहत असे अशी घरमालक यशवंत शुक्ला यांनी सांगितले.
ऋषिकेशच्या औरंगाबाद वास्तव्याविषयी अधिक माहिती देताना जगदीश कुलकर्णी सांगतात कि,” २०१४ मध्ये ऋषिकेशने माझे सिडको भागातील सोनामात शाळेजवळचे दुकान भाड्याने घेऊन पतंजलीचे दुकान टाकले होते. या दुकानावर ऋषिकेशची पत्नी,आई-वडील किंवा स्वतः तो बसायचा. मात्र,२०१६ मध्ये नोटबंदी झाल्यानंतर तो अचानक दुकान सामानासहित विकून येथून निघून गेला होता.