मद्यधुंद अवस्थेत ३०० फूट दरीत कोसळलेल्या वृद्धाला दिले जीवनदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी गावानजीक असणाऱ्या मल्लिकार्जुन डोंगर परिसरात बुधवारी रात्री ८० वर्षीय वृद्ध मद्यधुंद अवस्थेत डोंगरावरील देवस्थान परिसरात गोटखिंडीकडे जाणाऱ्या मार्गावर ३०० फूट खोल दरीत पाय घसरून पडल्याची घटना घडली. ग्रामस्थ व रेस्क्यू टीमच्या मदतीने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या वृद्धाला बाहेर काढण्यात यश आले.

येडेनिपाणी जवळ मल्लिकार्जुन डोंगर आहे. या डोंगर परिसरात बुधवारी रात्री एक ८० वर्षीय वृद्ध मद्यधुंद अवस्थेत निघाला होता. त्या वृद्धाचा पाय घसरल्याने ३०० फूट खोल दरीत तो कोसळला. त्याठिकाणी असणाऱ्या कुत्र्याच्या भुंकण्याने मंदिरातील सर्व पुजाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली असता सदर वृद्धाची चप्पल टोपी व त्या इसमाची पिशवी सापडली.

सदर इसम दरीत पडल्याची शंका आल्याने पुजाऱ्याने सरपंच सचिन पाटील व पोलिस पाटील बाबासाहेब गुरव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मध्यरात्री बारा ते दोन वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून सात ते आठ जणांच्या मदतीने सदर व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर इसम मालेवाडीतील असल्याचे सांगत आहे परंतु मालेवाडी येथे त्याचा पत्ता सापडत नाही. त्या वृद्धांची ओळख पटविण्याचे काम आता ग्रामस्थ व सरपंच करत आहेत.

Leave a Comment