GBS Virus: दिलासादायक बातमी! पुण्यातील 5 रूग्णांची GBS वर मात

0
2
GBS Virus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

GBS Virus| पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुणे शहरातच रविवारी नव्याने नऊ रुग्ण आढळले आहेत. तर, आतापर्यंत एकूण 158 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे, त्यातील काही रुग्ण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांनी या आजारावर यशस्वी मात केली आहे.

पुण्यातील रुग्णसंख्या (GBS Virus)

महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, पुणे महापालिका हद्दीतील 31, समाविष्ट गावातील 83, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 18, ग्रामीण भागातील 18 आणि इतर जिल्ह्यातील आठ रुग्णांना GBS आजाराची बाधा झाली आहे. सध्या 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 48 रुग्णांवर आयसीयूत उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, 20 ते 29 वयोगटातील 35 रुग्ण, तर 0 ते 9 वयोगटातील 23 आणि 50 ते 59 वयोगटातील 25 रुग्ण GBS मुळे बाधित झाले आहेत.

ससूनमधील पाच रुग्णांना डिस्चार्ज

पुणे शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच ससून रुग्णालयातून पाच रुग्ण बरे झाल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे. या रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी, रुग्णालय प्रशासनाने त्यांचा पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन सन्मान केला.

दरम्यान, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. एच. बी. प्रसाद, डॉ. सोनाली साळवी, डॉ. हर्षल भितकर, डॉ. संजय मुंढे, डॉ. धनंजय ओगले, डॉ. नागनाथ रेडेवाड आणि डॉ. नेहा सूर्यवंशी यांच्या टीमने या रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.

तीन संशयित रुग्णांचा मृत्यू (GBS Virus)

सध्या पुण्यात जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. लक्षात घ्या की,
जीबीएस हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून, शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर झाल्यास हा त्रास होतो. त्यामुळे लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे.