हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये लोकसभेला जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला… जिल्ह्यातील प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग बाप्पांसारखा सर्वसामान्य विस्थापित घरातला चेहरा खासदार झाला… या सगळ्यात मोठा वाटा हा मराठा आरक्षणाचा होतच, पण त्याहून जास्त होता तो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा… भाजपच्या ताब्यात असलेल्या या गेवराईने बजरंग बाप्पांच्या बाजूने तब्बल 40 हजारांहून अधिकचं लीड दिलं… हा आकडा दाखवून देतोय की भाजपचे विद्यमान आमदार असणाऱ्या या मतदारसंघात यंदा शरद पवारांची तुतारी वाजणार हे कन्फर्म आहे… पण ही तुतारी पवार – पंडित या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांकडून न वाजवली जाता एका सर्वसामान्य शेतकरी मुलीकडून वाजवली जाण्याची शक्यता आहे… गेवराईत सध्या चर्चेत आलेली ही तरुणी आहे तरी कोण? पंडित आणि पवार याच राजकीय कुटुंबांनी वर्चस्व गाजवलेल्या गेवराईत निवडून येणं या नव्या चेहऱ्यासाठी शक्य आहे का? त्याचाच घेतलेला आढावा…
बदामराव पंडित, अमरसिंह पंडित, लक्ष्मण पवार…. तीच तीच नाव गेवराई विधानसभा मतदारसंघात लढत देतात.. निवडून येतात… इतिहासात मागच्या चाळीस वर्षात गेवराई विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचे वर्चस्व राहिलं… 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव करत आमदारकीच्या चाव्या पंडित कुटुंबाकडून पवार कुटुंबाकडे शिफ्ट केल्या… इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पंडित चुलते-पुतणे एकत्र आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदामराव पंडित हे उमेदवार होते आणि अमरसिंह पंडित हेही राष्ट्रवादीमध्ये असल्या कारणाने त्यांनी चुलते बदमराव पंडितांचा प्रचार केला. खरंतर गेवराईच्या इतिहासामध्ये बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित हे कडवे विरोधक म्हणून ओळखले जायचे. मात्र या निवडणुकीमध्ये दोन्ही पंडित एकत्र आले तरीही भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा तब्बल 60 हजार मतांनी पराभव केला होता… मागच्या पन्नास वर्षात पवार कुटुंबातील तीन पिढ्यात तीनदा आमदारकी आली. यात सर्वात आधी शाहूराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली. त्यानंतरच्या काळामध्ये माधवराव पवार यांनी सुद्धा शिवाजीराव पंडित यांचा पराभव केला होता आणि 2014 ला लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडितांचा पराभव करत परंपरा कायम ठेवली..
मात्र 2019 ला राजकारण आणखीन अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचलं…अमरसिंह पंडित राष्ट्रवादीकडून तर युतीत ही जागा भाजपचे स्टॅंडिंग आमदार लक्ष्मण पवार यांना सुटल्याने शिवसेनेच्या बदामराव पंडितांनी अपक्ष मैदानात उतरत गेवराईची निवडणूक इंटरेस्टिंग ठरवली… पण शेवट सरशी मारली ती भाजपच्या लक्ष्मण पवारांनीच… सध्या बदामराव ठाकरे गटात आहेत तर विजयसिंह पंडित यांनी अजितदादांना साथ दिलीय… त्यामुळे इथे आपसूकच शिवसेना ठाकरे गटविरुद्ध भाजप, बदामराव पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार अशी लढत होणार अस दिसत असताना विजयसिंह पंडितांकडे बंड करण्याशिवाय पर्याय राहणार नाही… पण या सगळ्यात पवार आणि पंडित यांची नावं बाजूला सारून एका नव्या नावाची चर्चा मतदारसंघात होतेय, आणि ते नाव म्हणजे पूजा मोरे…
पंडित आणि पवार या दोन राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाचा राजकारणाला आता गेवराईची जनताही कंटाळलेली दिसतेय… म्हणूनच लोकसभेला प्रस्थापित मुंडेंना डावलून गेवराईनं बजरंग बाप्पांच्या पारड्यात निर्णायक लीड टाकलं… अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा म्हणावा असा प्रतिष्ठित चेहरा मतदार संघात नसताना हा गॅप भरून काढत पूजा मोरे यांनी बजरंग बाप्पांचं अगदी जीव तोडून काम केलं… तसं शिवसेना आणि भाजप अशीच कायम गेवराईची आमदारकीची लढत राहिल्याने यंदा मात्र बजरंग बाप्पांना इथून लीड मिळाल्याने तुतारीकडून पूजा मोरे यांचं नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत येतय… मराठा क्रांती मोर्चात केलेलं आक्रमक भाषण, फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणे ते पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण तडफदार चेहरा म्हणून पूजा मोरे यांचं नाव समोर आलं.. मात्र विधानसभेच्या आधीच शरद पवार गटात प्रवेश करत राष्ट्रवादीच्या किसान आघाडीच्या त्या प्रमुख आहेत… लोकसभेच्या निमित्ताने बजरंग बाप्पांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून त्यांनी गेवराई मतदार संघात काम केलं… इतकच काय तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातही त्या सर्वात जास्त फ्रंटला आहेत… त्यामुळे गेवराईची जागा मविआमध्ये शरद पवार गटाला सुटली तर पूजा मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो…
रेल्वे, दुष्काळाच्या झळा, पाणीप्रश्न, एमआयडीसी आणि कोणताही औद्योगिक सपोर्ट नसणं, राक्षस भुवन – त्वरीता देवी यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा रखडलेल्या विकास आणि ऊसतोड मजुरांचा वाढलेला आकडा हे सगळे प्रश्न गेवराईसाठी भुषावह नक्कीच नाहीत… त्यामुळे गेवराईची जनता मतदारसंघासाठी नव्या चेहऱ्याचा विचार करू पाहतेय… त्यासाठीच शरद पवार गटाकडून पूजा मोरे यांच्या सोबतच अनेक तरुण राजकारणांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत… त्यामुळे पहिल्यांदाच पवार आणि पंडित हे दोन चेहरे वगळता मतदार संघाला तरुण तडफदार आमदार मिळण्याची यंदा संधी आहे… पण तिकीट वाटपाच्या खेळात जो प्रस्थापितांना डावलून तिकीट आपल्याकडे खेचून आणणार, तोच जिंकणार… असं सध्या गेवराईचं राजकीय वातावरण आहे…
त्यामुळे लोकसभेला मायनस मध्ये गेलेले लीड, रखडलेली विकास कामे आणि बेरोजगार हात या सगळ्यांचा विचार करता गेवराईची जनता जो उमेदवार खिशाला दाम – हाताला काम देईल, त्यालाच आपण निवडून देऊ, असा राजकीय स्टॅन्ड घेण्याच्या विचारात आहे… सध्या तरी महायुतीकडून भाजपचे स्टॅंडिंग आमदार लक्ष्मण पवार यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब होऊ शकतो… लोकसभेच्या निकालातून त्यांची आमदारकी धोक्यात दिसत असली तरी ‘ज्याचा आमदार त्याला सीट’ असा फॉर्म्युला ठरला तर पवार निश्चिंत होऊ शकतात… अजितदादा युतीत कायम राहिले, तर इथून अमरसिंह पंडितांना बंड करण्या वाचून पर्याय उरणार नाही… अर्थात यामुळे होणाऱ्या मत विभाजनाचा फायदा हा मविआला होऊ शकतो, असा अंदाज सध्या तरी बांधता येईल…
बाकी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट बदामराव पंडितांसाठी ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू शकते… त्यातही शरद पवारांनी मेरिटच्या बेसिसवर ही जागा आपल्याकडे वळवून इथून तरुण उमेदवाराला संधी दिली, तर कदाचित गेवराई विधानसभेला सर्वसामान्य कुटुंबातला नवा कोरा चेहरा आमदारकीच्या खुर्चीवर पाहायला मिळू शकतो… फक्त हे सगळं घडून येण्यासाठी ठाकरे गटानं ही जागा शरद पवारांसाठी सोडणं ही अट आहेच! म्हणूनच गोदावरी नदीच्या काठावरील गेवराईत यंदा आमदार कोण होतोय? लक्ष्मण पवार, अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, बदामराव पंडित, पूजा मोरे की आणखी कुणी? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? गेवराईचा पुढचा आमदार कोण? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा