हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gharkul Yojana । केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल. तसेच यासाठी तब्बल 80 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ग्रामविकास व पंचायत राज व राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण- गृहनिर्माण विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, 2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात बेघर असलेल्यांना घरे देण्यासाठी (Gharkul Yojana) प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. राज्याचे उद्दिष्ट अत्यंत कमी होते. 2017 मध्ये हे उद्दिष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दीष्ट मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे त्यावेळी केली. त्यानंतर आलेल्या आवास प्लस योजनेत नोंदणीची सुविधा केंद्राने दिल्याने 30 लाख बेघराची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असतांना केंद्राने 20 लाख घरकुलांना मंजुरी दिली. त्यापैकी 10 लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केले आहे. आता नव्याने 10 लाख घरकुलांचे पत्र मिळाल्याने जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी घरकुलाशिवाय राहणार नाही. तसेच यात अजून कुणी सुटले असल्यास नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल अशीही माहिती फडणवीसांनी दिली.
राज्य सरकारही देणार 50,000 रुपये – Gharkul Yojana
फडणवीस पुढे म्हणाले, बेघरमुक्त महाराष्ट्र, प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र अशा प्रकारची संकल्पना राज्य सरकार राबवत आहे. घराची मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार पीएम आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरे देत असताना राज्य सरकारनेदेखील त्यासाठी अधिकचे 50,000 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घराला सोलर पॅनल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे, घरकुलांचे उद्दिष्ट (Gharkul Yojana) वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग अत्यंत वेगाने काम करीत आहे. बेघरमुक्त महाराष्ट्राची संकल्पना राबविण्याचे प्रयत्न होत आहे. जागेची कमतरता असतांना दुमजली घरे, गृहसंकुलासारख्या संकल्पना राबवून ती समस्या दूर करण्यात आली.