हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या मधुर आवाजातून सर्वांना भुरळ पाडणाऱ्या लोकप्रिय गझलकार आणि गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज उदास यांच्या निधनाच्या बातमीमुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्याच कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पंकज यांच्या चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना याचा मोठा धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वीच पंकज उधास यांच्या कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी सर्वांना भेटायचे टाळले होते. यातील मधल्या काळात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज अचानक पंकज यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सध्या पंकज यांच्या निधनाच्या बातमीनंतर संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंकज उदास यांचा प्रवास..
पंकज उदास यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक गाणी गझल गायल्या. त्या गझल आजही संगीत प्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या चिठ्ठी आयी है, या गाण्याने तर सर्वांनाच वेड लावले होते. तसेच, और आहिस्ता कीजिए बातें, ना कजरे की धार, चांदी जैसा रंग है तेरा, मत कर इतना गुरुर, आज फिर तुम पर प्यार आया है, अशी त्यांची अनेक गाणी देखील लोकप्रिय ठरली. त्यांनी आपल्या याचं गायनाच्या कलेतूनच संगीत क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळेच त्यांचा संपूर्ण जगभरामध्ये चाहता वर्ग निर्माण झाला.
पंकज उदास यांनी सर्वात प्रथम १९८० साली आहत नावाच्या अल्बमच्या माध्यमातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. या अल्बमनंतर त्यांना अनेक गाणी ऑफर करण्यात आली. खरे तर, चिठ्ठी आयी है या गाण्याने ते घरोघरी पोहोचले. त्यांचे अनेक लाइव्ह कॉन्सर्ट देखील होत असतं. त्यांच्या या संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना 2006 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आज पंकज उदास यांच्या निधनामुळे गझल देखील नि:शब्द झाली आहे.