मुंबई | सणासुदीच्या काळात ग्राहकांना भेसळ युक्त दूध घ्यावे लागू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. काल झालेल्या मोहिमेत सुमारे साडे तीन लाख लिटर दूध सील केले गेले तर किमान 20 हजार लिटर भेसळ युक्त दूध नष्ट केले आहे. मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या मुलुंड नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका, ऐरोली टोल नाका, मुलूंड पूर्व नाका या पाच ठिकाणी दुधाची तपासणी करण्याची मोहीम राबवली गेली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट यांच्या मार्गदर्शनात झालेली ही मोहीम पाचही ठिकाणी एकाच वेळी पहाटेपर्यंत सुरु होती. या तपासणीमध्ये 227 वाहनांतील 9 लाख 22 हजार 928 लिटर दूध तपासण्यात आले या प्राथमिक तपासणीत दुधाचे पाच ब्रँडचे नमुने कमी प्रतीच्या दर्जाचे आढळले त्यामुळे 3 लाख 44 हजार लिटर दूध सील केले तसेच दुधाच्या आठ टँकरमध्ये भेसळयुक्त दूध आढळून आले. या भेसळीमध्ये अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले. त्यामुळे हे 19 हजार 250 लिटर दुध नष्ट करण्यात आले. हे दूध ज्या जिल्ह्यातून आले होते, त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाचे 60 ते 70 अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
दुधाला पूर्ण अन्न म्हणून मान्यता आहे. आजही प्रत्येक घरात लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत दूध घेतले जाते. या दूधापासून खवा, दही, पनीर, चीज, आईसक्रीम व विविध प्रकारच्या मिठाई तयार होतात. मात्र दुधाची वाढती मागणी लक्षात घेता भेसळखोरांकडून यात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावर बंधन आणण्यासाठी शासन कठोरात कठोर कारवाई करत आहे, अशी माहिती श्री. बापट यांनी दिली.