नरहर कुरुंदकरांचा शोध घेताना – गिरीश कुबेर (पुणे येथील संपूर्ण भाषण)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल २३ फेबुवारी २०२०, सायंकाळी ५ वाजता गोखले इन्स्टिट्यूटच्या सभागृहात जनसहयोग ट्रस्ट आणि नरहर कुरूंदकर प्रगत अध्ययन संशोधन केंद्र यांच्यावतीनं आयोजित केलेलं वेध नरहर कुरूंदकरांचा या विषयावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं जाहीर व्याख्यान होतं.

पावणेपाचला सभागृहात पोहोचले, तेव्हा समोरची रांग सोडली तर संपूर्ण सभागृह खचाखच भरलं होतं. पाच वाजता कार्यक्रम सुरू होणार असला तरी येणार्‍या लोकांची गर्दी वाढतच चालली होती. अखेर व्यासपीठावर खुर्चा टाकून, मांडी घालून लोक खाली बसले. तरीही जागा पुरेना मग खुर्च्यांच्या मधल्या जाण्यायेण्याच्या मार्गातही काहींनी बैठी आसन व्यवस्था स्वीकारली. इतकंच नाही तर व्यासपीठाच्या समोरही अनेकांनी खाली बसणं पसंत केलं. यात अभिनेता गिरीश कुलकर्णी देखील होता. खरं तर आयोजकांनाही इतकी गर्दी होईल असं वाटलंच नसावं. या गर्दीत बहुसंख्य तरूण होते. सगळेचजण गिरीश कुबेर यांना ऐकायला उत्सुक होते.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्पल यानं नेटकेपणानं केलं. गिरीश कुबेर यांचा परिचय देखील अगदी दोन ओळीत त्यानं करून दिला. (काही लोकांना सगळेच ओळखत असतात. त्यामुळे माहीत असलेलं सगळं तेच पुन्हा वाचण्यात आणि सांगण्यात उत्पलनं वेळ दवडला नाही त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन!) त्यानंतर विश्वास कुरूंदकर यांनी कुरूंदकर प्रगत अध्ययन संशोधन केंद्राच्या कामाविषयी माहिती दिली, तर जनसहयोग ट्रस्टच्या वतीनं राजेंद्र बहाळकर यांनी अगदी थोडक्यात माहिती दिली. कुठलीही औपचारिकता न पाळता लगेचच गिरीश कुबेर यांनी बोलायला सुरुवात केली.

सुरुवातीलाच त्यांनी विश्वास कुरूंदकर, विश्वंभर चौधरी, राजेंद्र बहाळकर या सगळ्यांचे मनापासून आभार मानले आणि आज आपल्याला नरहर कुरूंदकर यांच्यावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं तो आपला मोठा सन्मान समजतो असं ते म्हणाले. कुरूंदकरांवर बोलण्याची संधी मिळणं म्हणजे जन्मापासून स्वतःच्या मेंदूवर साचत आलेली जळमटं दूर करण्याची ती एक संधी आहे असं ते म्हणाले.

गिरीश कुबेर यांचं मुख्य भाषण

‘ज्या उत्साहानं लोक केंब्रिजमध्ये फिरत असतील त्याच उत्साहानं या परिसरात फिरताना वाटतं, एक विचित्र प्रकारची हुरहूर मनाला लागते. याच परिसरात गोपाळ कृष्ण गोखले राहत होते. इथेच महात्मा गांधीची एक खोली कायमस्वरूपी ते आले तर त्यांना उतरण्यासाठी ठेवली होती. अशा वास्तूमध्ये नरहर कुरूंदकरांवर बोलायचं हे माझ्यासाठी दुहेरी आव्हान आहे. गणिताचा पेपर प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये आणि परीक्षक आईन्स्टाईन असेल तर काय होईल असं आज माझं झालंय’, असं कुबेर म्हणाले. कुरूंदकर का झाले आणि नंतर कुरुंदकरांच्या जवळपास जाणारं देखील कोणी का झालं नाही या दोन भागात विभागणी करून आपली मांडणी असेल असं ही कुबेर म्हणाले.

कुरूंदकरांसारखा माणूस अचानक निर्वात पोकळीत पटकन तयार होत नाही. आसपास मोठी मशागत झालेली असावी लागते. ती या भूमीत झाली होती. पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांचं राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर महाराष्ट्रानं जे देशाला दिलं आहे तितकं कुठल्याच भागानं दिलं नाही. समाजसुधारणेची चळवळीची सुरुवात भले प. बंगालमध्ये झाली असेल, राजा राममोहन रॉय त्या चळवळीचे जनक असतील. पण त्यानंतर दोनएक वर्षात एक मोठा माणूस या भूमीत जन्माला आला. त्याचं नाव बाळशास्त्री जांभेकर.

खरं तर युरोपमध्ये प्रबोधनाचा काळ खूप महत्वाचा मानला जातो. तसा काळ आपल्या देशात झाला नसला तरी महाराष्ट्रात मात्र अशा वैचारिक पुनरूत्थानाचा काळ तेव्हापासून सुरू झाला. देशामध्ये ती सुरुवात करणारा पहिला माणूस म्हणजे बाळशास्त्री जांभेकर! वर्षातून एकदा आपण दर्पण स्मृति दिन साजरा करतो किंवा त्यांच्या नावानं पुरस्कार देतो बस्स यापलीकडे त्यांची आपल्याला ओळख नाही. या माणसाचं काम बघितलं तर थक्क व्हायला होतं.

इंग्रजांनी आर्थिक शोषण कसं केलं आहे, त्यांना या भूमीतून कसा विरोध व्हायला हवा याची शास्त्रशुद्ध मांडणी जांभेकरांनी पहिल्यांदा केली. ग्रीक, अरेबिक, लॅटिन, फ्रेंच, फारसी, बंगाली, गुजराथी आणि कन्नड इतक्या भाषांवर या माणसाचं प्रभुत्व होतं. १८१२ ते १८४६ या ३४ वर्षांच्या कालावधीत या माणसानं इंग्लडच्या, भारताच्या इतिहासावर काम केलं. इंग्रजापासून आपलं काही भलं करायचं असेल तर इंग्रजी शिकायला हवं अशी भूमिका हा माणूस मांडत होता. त्यांनी नेटिव्ह इम्पु्रव्हमेंट सोसायटी स्थापन केली आणि तिथे अनेक जागतिक विषयांवर मांडणी केली जात असे. यात दादाभाई नौरोजी, शंकरशेठ वगैरे मंडळी चर्चा ऐकायला येत.

कलकत्यामधल्या चळवळी पुढे धार्मिक अंगानं गेल्या पण महाराष्ट्रातल्या चळवळी मात्र करकरीत बुद्धिवादी झाल्या.या मिनी रेनेसाँन्सच्या काळात बाळशास्त्री जांभेकर, तर्खडकर घराण्यातले तिघेजण, गोपाळ हरी देशमुख- लोकहितवादी, जोतीराव फुले, पं. विष्णु परशुमरा शास्त्री, भांडारकर प्राच्य विद्याचे भांडारकर, नारायण महादेव परमानंद, महादेव गोविंद रानडे, (रानडेंनी पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि काँग्रेस हा शब्द त्यांनीच दिला, अशा पद्धतीची चळवळ देशांत असायला हवी असा विचार त्यांना पहिल्यांदा सुचला.)

विष्णुशास्त्री चिपळूणकर, गणेश वासुदेव जोशी, गोपाळकृष्ण आगरकर, पंडिता रमाबाई आणि अलीकडचे धोंडो केशव कर्वे! असे अनेक लोक या कालखंडात होऊन गेले. यांचा प्रभाव म्हणजे पुणे हे देशाचं बौद्धिक आणि राजकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. महादेव बल्लाळ नामजोशी यानं ‘किरण’ नावाचं साप्ताहिक काढलं. आर्थिक साक्षरता या विषयाला वाहिलेलं हे पहिलं साप्ताहिक होतं. भांडवल कसं उभं करावं हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता आणि ते गावोगावी जाऊन लघुउद्योगाचा प्रसार करत. त्या वेळी इंटरनेट नसताना ही माणसं उद्याच्या जगात आर्थिकदृष्ट्या संपन्न देश कुठले असतील हे सांगत होती. इतकी दूरदृष्टी त्यांना होती.

सांगलीजवळच्या तासगावचे विष्णुपंत छत्रे विद्वान गणिती होते, तर शंकर आबाजी भिसे यांना इंग्लंडच्या पत्रकारांनी इंडियन एडिसन म्हटलं होतं. इंजिनियर असलेले भिसे नवनवीन प्रयोग करून अनेक प्रकारची यंत्र तयार करत. ज्या कालखंडामध्ये पेटंट हा शब्द कोणाला माहीत नव्हता त्या काळात त्यांनी २०० पेटंटसाठी अर्ज दाखल केले होते आणि त्यापैकी ४० पेटंट त्यांच्याकडे होते. श्रीधर सर्वोत्तम जोशी हे जीवशास्त्रज्ञ देखील याच काळातले होते. आजच्या काळात अशक्य वाटावं अशी माणसं आणि असं त्याचं कार्य त्या काळी सुरू होतं. वसंत रामजी खानोलकर हे औषधशास्त्रातले विद्वान होते.

या सगळ्या माणसांवरून महाराष्ट्राची भूमी, तिचा विचारांचा वारसा कसा होता हे कळतं. देशातला पहिला तत्त्ववेत्ता हा पुण्यात जन्मला. ‘धर्म आणि नीतिमत्ता यांचा काडीचाही संबंध नाही’ असं निर्भीडपणे सांगणारा आगरकर याच भूमीतला. अशी तेजाची शलाका महाराष्ट्रात पसरत होती. अनेक विचारांचे धुमारे फुटत होते. महाराष्ट्रानं वैचारिक प्रांतामध्ये मुशाफिरी केली आणि हाच तेजस्वी प्रवाह आपल्याला कुरूंदकरांपर्यंत आणून पोहोचवतो.

नरहर कुरुंदकर

कुरूंदकरांचा जन्म १९३२ मध्ये झाला. अवघं ५० वर्षांचं त्यांचं आयुष्य. त्यांनी स्वातंत्र्यलढा, देशाची उभारणी, वैचारिक घुसळण हा सगळा काळ बघितला. याच वेळी आंबेडकरांसारखा एक माणूस वेगळा विचार घेऊन येत होता. आपण मात्र या माणसाचा पुतळा करून टाकला. त्यांना घटनाकार म्हटलं की विषय संपला. खरं तर आंबेडकरांनी रूपयाचं मूल्य किंवा किंमत या विषयावर १९२० साली निबंध लिहिला होता. ते खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. रिझर्व्ह बँकेचा जन्म त्यांच्या प्रयत्नांतून आणि पुढाकारातून झाला. हे सगळं महाराष्ट्राच्या भूमीत घडत होतं.

एकीकडे स्वातंत्र्यलढा, तर दुसरीकडे आंबेडकरांची जातिव्यवस्थेवर स्वतंत्र उभारणी, एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उभारणी, तर दुसरीकडे सावरकरांच्या हिंदू महासभेची स्थापना, त्याच वेळी एकीकडे समाजवादी चळवळ, तर दुसरीकडे कट्टर डाव्यांचं केंद्र असं सगळं महाराष्ट्रात सुरू होतं.

याच महाराष्ट्रात विचारांच्या पातळीवर अनेक विराधाभासही आहेत. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा करणारा मराठी आहे आणि त्यांचा नायनाट करणारा देखील मराठी आहे. महाराष्ट्रात लोखंडे, काँ. डांगे असे डाव्या विचारांचे लोकही होते. विचारांची भूक असलेले सगळ्या प्रकारचे लोक कुरूंदकरांना बघायला मिळाले. हा माणूस अशा कालखंडात घडत होता. अर्थात तरीही सगळेच कुरूंदकर झाले नाहीत.

कुबेरांना कुरूंदकरांच्या आयुष्यातल्या काही घटना सांगितल्या. कुरुंदकर अनेक वर्ष नापास झाले आणि नापास झाल्यावर ते पास झालेल्यांना वाईट वाटावं अशा तर्‍हेनं मिरवत होते. १९५२ च्या निवडणुकीत समाजवादी पक्ष निवडून येईल आणि काँग्रेसचा निःपात होईल असं त्यांना वाटत होतं. पण निवडणुकीत सगळे समाजवादी साफ झाले. त्या वेळी वैचारिक रोमँटिसिझम आणि वास्तव वेगळं असल्याचं कुरूंदकरांना कळलं असावं आणि त्यानंतर मात्र नापास होणं, मिरवणं फार झालं असं त्यांना वाटलं असावं. त्यामुळेच पुढल्या काळात स्वतःच्या बांधणीच्या कामाला लागले. त्यांचा नंतरचा काळ त्यांच्या बौद्धिक प्रगतीचा आहे.

असं म्हणतात अत्र्यांची स्मरणशक्ती दृष्टीशी निगडित होती. म्हणजे तिला एलिफंटाईन मेमरी म्हणतात. ते खूप स्पीडनं वाचत असत. अशीच स्पीड कुरूंदकरांची देखील होती. साहित्य, संगीत, राज्यशास्त्र, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, वेद, उपनिषदं, रहस्य कथा, शृंगारिक वाडमय, इतक्या सगळ्या विषयात त्यांची मास्टरी होती.

कुरूंदकरांचं व्यक्तिमत्व जाणून घेताना, ‘मी मार्क्सवादी आहे पण साम्यवादी नाही’ असं ते परस्परविरोधी विधान करत. ते साम्यवादाबद्दल बोलताना म्हणत, कामगारांना एक व्हा असं म्हटलं ते तेव्हा ठीक होतं, पण काळ बदलला, परिस्थिती बदलली, संदर्भ बदलले की प्रश्न बदलतात. त्याप्रमाणे आपण बदलायला पाहिजे. सत्याच्या अनेक बाजू असू शकतात. त्यामुळे सगळ्या बाजू समजून घ्यायच्या असतात. शिवाजीबद्दल बोलताना ‘शिवाजी शिवाजी करत मराठ्यांनी फार अभिमान बाळगू नये’ असं कुरूंदकर म्हणत. कारण शिवाजी स्वतःला राजपूत मानत होता आणि असं मांडण्याची ताकद फक्त कुरूंदकरांकडे होती.

अतिरेकी प्रेम आणि मालकी अशा गोष्टी त्यांनी टाळल्या. कुरूंदकर विविध अंगांनी समोर येतात. म्हणूनच त्यांच्या विचारांचा आवाका थक्क करणारा आहे. एकाच विषयाचा अनेक अंगांनी कुरूंदकर धांडोळा घेतात. आंबेडकर त्यांच्या आदराचा विषय असूनही त्यांना घटनाकार म्हणायची गरज नाही असं त्यांनी म्हटलं. त्यासाठी आंबेडकर काय म्हणाले याचा दाखला कुरूंदकरांनी दिला.

स्वतः आंबेडकर म्हणायचे, १९३५ चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या आधारे आपण घटना बनवली आहे. अभ्यास करून, दाखले देऊन कुरूंदकर आपलं म्हणणं मांडत आणि अशी मांडणी करायला आपली भूमिका ठामपणे मांडायला खूप मौठी बौद्धिक ताकद लागते आणि ती कुरुंदकरांकडे होती. कुरूंदकर कधी भावनेच्या लाटेत वाहवत गेले नाहीत. कुरूंदकरांनी प्रत्येक क्षेत्रात सखोल अभ्यास केला. म्हणून ते मोठे आहेत. कुठल्याही विषयाच्या मुळाशी जायचं आणि त्याला सर्वांगाने बघून मग आपली भूमिका ते मांडत.

‘सर्व धार्मिक माणसांचा बुद्धूपणा हे माझ्या जीवनातलं फार मोठं दुःख आहे. धार्मिक माणसांची बुद्धीच मंद होते अशी माझी ठाम समजूत आहे. माणसांच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचं आणि प्रगतीला अडथळा आणण्याचं काम हे धर्मानं केलं आह’ असं नरहरक करुंदकर म्हणत. त्यांनी समुद्रमंथनापासून अनेक पौराणिक दंतकथेचे दाखले देत लबाडपण असल्याखेरीज देवत्व येत नाही असं म्हटलं. देव कसा लबाड असतो याचे शंभर दाखले त्यांनी दिले आहेत. धर्मानं माणसाला हिंस्त्र केलं. धर्म जर शांततावादी असेल तर माणसांमध्ये हिंस्त्रपणा कसा आणला अशी मांडणी कुरुंदकर करतात.

शिवाजी, आंबेडकर, धर्म अशा अनेक गोष्टीबद्दल कुरूंदकर बोलतात. आज असा बोलणारा माणूस असता तर हाहाकार उडाला असता असं कुबेर म्हणाले. भावना बाजूला ठेवून करकरीत बुद्धिवादानं मुद्दे मांडणारा हा माणूस होता असं कुरुंदकरांबद्दल कुबेर म्हणाले. त्या वेळी माणसं विचार करत, वाद करत, चर्चा करत. या सगळ्या गोष्टी करण्याची त्यांना मोकळीक होती.

कुरुंदकरांच्या एका पुस्तकावर मे. पू. रेगे यांनी प्रचंड टीका केली. टीका करण्यासाठी त्या माणसापेक्षा जरा वरचं माणूस असावं लागतं. जसं आईन्स्टाईननं म्हटलं होतं की समस्या आणि तिचं उत्तर हे दोन्हीही एका प्रतलावर असून चालत नाही. तसं रेगेंनी पुस्तकावर खरपूस टीका केली. कुरूंदकर त्यावर म्हणाले, ‘मी आता सुटलो. मला जे वाटत होतं, माझ्या युक्तिवादावर तुम्ही युक्तिवादानं उत्तर द्याल पण तसं झालं नाही. त्यामुळे माझा युक्तिवाद अबाधित राहिला आहे.’ असं मोकळेपणे पण परखड मत व्यक्त करण्याचा तो काळ होता.

इतिहासकार राजवाडे यांच्या स्पष्टवक्तेपणाचं एक खुसखुशीत उदाहरण कुबेरांनी दिलं.
बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्यानं प्रबोधनाचा काळ सुरू झाला आणि तो १९८२ च्या टप्प्यात म्हणजेच कुरूंदकरांच्या मृत्यूबरोबर संपला. त्यानंतर कुरूंदकरांसारखं कोणी का झालं नाही याचा वेध घ्यायला हवा. हा संघर्ष बुद्धीचा संघर्ष आहे. मुसलमानांच्या संदर्भात ते म्हणाले, ‘तुम्हाला या व्यवस्थेत राहायचं तर खर्‍या अर्थानं तुम्हाला सेक्युलर व्हावं लागेल. अन्यथा तुम्हाला तुमचा धर्म या देशावर प्रेम करू देणार नाही.’ असं म्हणणारेच कुरूंदकर पुढे म्हणतात,‘मुसलमान खरे सेक्युलर व्हावेत असं वाटत असेल तर आधी हिंदूंना सेक्युलर व्हावं लागेल.’

कुरूंदकर मोठे ठरतात कारण बुद्धीच्या प्रांतात तुम्ही या माणसाला गृहीत धरू शकत नाही. भारतामधली नंतरच्या कालखंडातली विद्वानांची परिस्थिती बिकट का झाली तर भारतातले विद्वान नंतर प्रेडिक्टेबल बनले. आणि हा विद्वानांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आता कुठल्याही एका विद्वानाचं नाव घेतलं तर तो काय बोलेल, किंवा काय लिहील हे आपण छातीठोकपणे सांगू शकतो. खरी विद्वता ही अशी असते की ज्या क्षणी तुमचा अंदाज बांधता येतो त्या क्षणी तुमची विद्वता संपते.

कुबेरांनी एक उदाहरण सांगितलं,एकदा दुर्गाबाई गोविंदराव तळवळकरांना ते निवृत होणार म्हणून भेटायला आल्या होत्या. पुष्पा भावे त्याच वेळी आलेल्या होत्या. बोलता बोलता सेना भाजपचं सरकार आलं त्याचा विषय निघाला. त्यावर पुष्पा भावे यांनी ‘ही लोकशाही नाही’ असं म्हटलं. तर दुर्गाबाई म्हणाल्या, ‘माझ्याच आवडीचं सरकार असावं असं म्हणणं हा लोकशाहीच विचार असू शकत नाही. हा हुकूमशाहीकडे नेणारा प्रवास आहे’ असं बोलण्याची ताकद दुर्गाबाईंकडे होती. अशी खरी बौद्धिक भूमिका घेतली जाते तो समाज सजग आणि जागरूक असतो. त्यानंतर दुर्गाबाई असोत की आणखी कोणी, अशी सगळी माणसं हळूहळू निघून गेली.

कुरूंदकरांनाही आपण कुठल्याच चौकटीत बसवू शकत नाहीत. त्यांच्या ज्या भूमिका होत्या, त्या प्रामाणिकपणे मांडायला त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. संघाविषयी, मनुस्मृतीविषयी त्यांनी आपली मतं जाहीरपणे मांडली. आज आपण अशा प्रामाणिक, निःपक्षपाती आणि विद्वान माणसांना गमावून बसलो आहोत आणि म्हणून कुरूंदकर तेव्हा का झाले आणि आज का होऊ शकत नाहीत याची कारणं या सगळ्या परिस्थितीमध्ये, आजच्या वास्तवामध्ये आहेत. दुसर्‍या विचाराचं स्वागत करणं हा टप्पा आपण केव्हाच मागे टाकला आहे. विद्वानांनी आपला प्रामाणिकपणा सोडला तेव्हापासूनच आपला र्‍हास सुरू झाला. आपल्या मतांवर ठाम नसणं, वेळ येईल तशी भूमिका बदलणं याची काही नेत्यांची उदाहरणं गिरीश कुबेर यांनी सांगितली. असं कुरूंदकरांनी कधी केलं नाही.

कुठल्याही कालंखडातला, व्यवस्थेतला समाज असो नैतिक आणि बौद्धिक समाजावर दबाव असलेला एक खमका माणूस लागतोच लागतो. त्याची राजसत्तेला आणि धर्मसत्तेला भीती असावी लागते. बौद्धिक कंपूला देखील त्याचा दरारा असावा लागतो. तसा दरारा ८० ते ९० च्या दशकापर्यंत महाराष्ट्रात होता आणि त्या दरारावाल्यांचं नेतृत्व कुरूंदकरांकडे होतं.

संपादकांना बौद्धिकदृष्ट्या चीतपट करू शकेल असा तो खर्‍या अर्थानं अवलिया होता.
मराठी माध्यमांनी कुरूंदकरांवर अन्याय केला. तो अन्याय का झाला असावा, याची कारणं गिरीश कुबेरांनी दिली. ते म्हणाले, आपल्याला म्हणजेच समाजाला सामाजिकदृष्ट्या सपाटीकरण आवडतं. आपण सुमार आहोत आणि आपल्या आसपासही सुमारच असलेले बरे अशीच आपली इच्छा असते. हा आपल्या जीवनधारेचा गाभा आहे. फार बुद्धिमान आपल्याला झेपत नाहीत. रंगभूमी बघितलं तर कुठली नाटकं चालतात ते बघा, ‘मेंदीच्या पानावर’ सारखे कार्यक्रम किती दिवस? हे कमी की काय म्हणून मग आपण आपल्याकडे कसं सगळंच होतं असे अभ्यासाच्या अभावी असलेले युक्तिवाद करतो.

आपल्याकडे पुष्पक विमान कसं होतं वगैरे. सगळ्यांनी एकच पुष्पक विमान उडवलं आणि बनवलं की काय, दुसरं कोणाला बनवावं वाटलं नाही का असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. सध्या समस्यांचा गुंता झालाय कारण याच्या मुळाशी एकच सत्य आहे आणि ते महणजे आपण विचारांचा आधार केव्हाच सोडलाय. मधल्या शंभर दीडशे वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र ज्या तगड्या विचारांवर पोसला गेला होता, तसं पोषण करणारे आता नाहिसे झाले आहेत.

मनोरंजनाच्या बाजारपेठीय दबावाच्या नंतरच्या काळात बौद्धिक पोषणाची गरजच उरली नाही. आर्थिक उदारीकरणानंतर हा शेवटचा कालखंड सुरू होतो. ज्या वेळी माणसं विचार करायला लागतात, त्यावेळी ते समस्या निर्माण करतात आणि हे ऐतिहासिक सत्य आहे. हे रोमन साम्राज्यापासून हे चालत आलंय.

कुठल्याही राज्यकर्त्याची इच्छा एकच असते, की हवं ते घ्या पण विचार करू नका. आणि आपण हे आनंदात पाळतो. सगळ्यांचं सुखात चाललेलं असतं.  आज हे वास्तवाचं भान आणून देणारे खर्‍या अर्थानं निःपक्ष विद्वान नाहिसं होणं हे सध्याच्या बौद्धिक र्‍हासाचं कारण असावं. कुरूंदकर परिपर्णू होते का, तर व्यक्ती म्हणून त्यांच्याही जगण्याला मर्यादा होत्या. मात्र त्यांच्या किरकोळ असलेल्या मर्यादांमधला विसंवादी सूर पकडून आपण आपला सेन्स ऑफ प्रर्पोशन घालवून बसलो.

कुरुंदकरांना लहान ठरवण्यासाठी सुमारीकरण हाच एक कार्यक्रम सामुदायिक कार्यक्रम आपण राबवत बसलो. आपण माणसाला मोजण्याची मापंच चुकत गेलो. कुरूंदकर म्हणत, अमूक एक गायक खूप दारू पितो असं एकजण म्हणत होता. कुरूंदकर म्हणाले, अरे तूही पी. पण तुझा आवाज तसा लागणार आहे का? आपली अवस्था अशी आहे.

ते म्हणत, समानता आणि स्वातंत्र्य हे मुद्दे नैसर्गिक नाहीत. आपण जन्मतःच आपण असमानतावादी आहोत आणि जन्मतःच स्वातंत्र्य हिरावून घेणारे आहोत. स्वातंत्र्य आणि समानता ही दोन मुल्यं कष्टानं बिंबवावी लागतात. आपल्याला वाटतं, सरकार बदललं की बदल घडेल. पण तसं होत नसतं. बदलासाठी तीन पिढ्यांचा काळ जावा लागतो. तेव्हा बदल घडायला सुरुवात होते. यासाठी गिरीश कुबेरांनी वाहतुकीच्या नियमांचं सुरेख उदाहरण दिलं.

स्वातंत्र्य आणि समता मूल्य जन्मतच येत असं आपल्याला वाटतं. ज्या देशांनी ही मूल्यं रुजवली तेच देश महासत्तेकडे वाटचाल करताहेत. आपण सुमारीकरणाचा मुद्दा सोडायला हवा. सगळेच आपल्यासारखे असणं यात काहीच आनंद नाही. आपण याबाबतीत आंधळे होत चाललो आहोत. हे कुठेतरी बदलायला हवं.

आज लोक देशात का थांबत नाहीत, याचं कारण शोधावं लागेल. ज्या ठिकाणी विचारांचं स्वातंत्र्य आणि विचारांचं मोकळेपण आहे त्या देशात जायला तरुणांना आवडतं आहे. अशा देशांमध्ये शंभर कुरूंदकर झाले आहेत आणि होताहेत. आपल्याकडे एक कुरुंदकर झाला, पण त्यालाही आम्ही नीट सांभाळू शकलो नाही, अशी खंत गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.

आत्ममग्नता हा अधोगतीचा पहिला पाया असतो आणि तो ओलांडून आपण कधीच पुढे गेलो आहोत. आज कुरूंदकरांच्या विचारांचा जागर करणं आवश्यक आहे. कुरुंदकरांनी विचार दिला नाही, पण विचार कसा करायचा हा विचार दिला. जाँनिसार अख्तर यांचा खूप छान शेर आहे. कुठल्याच चौकटीत न बसणार्‍या कुरुंदकरांना तो लागू होतो.

ये हमसे ना होगा, किसी एक को चाहे
ऐ इष्क हमारी और तेरी नही जमेगी

कुरूंदकरांच्या बाबतीत विषय बुद्धीचा असायचा. आज मात्र आपल्या अवतीभवती जे काही चाललंय ते भावनेचा आस्वाद घेत चाललंय आणि त्याचे परिणाम आपण सगळे बघतो आहोत. म्हणून कुरूंदकरांच्या मार्गानं म्हणजेच बुद्धीच्या मार्गानं जायला हवं. त्यासाठी कुरुंदकरांचे विचार (त्यांची पुस्तकं) वाचायला हवेत. समजून घ्यायला हवेत.गिरीश कुबेरांचं दीड तासांच्या वर चाललेला संवाद थांबूच नये असा होता. अख्खं सभागृह गुंगून गेलं होतं.

कार्यक्रमाच्या शेवटी विश्वंभर चौधरी यांनीही कुरूंदकरांची काही वैशिष्ट्यं सांगितली. कुरूंदकर असेच घडत नाहीत तर त्यासाठी विसाव्या वर्षी आत्मभान यावं लागतं. पुण्यातल्या प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत एकदा संयोजक म्हणाले आता मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात आला आहे (त्या वेळी निजामांच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला होता) तर आपण मराठवाड्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तेव्हा कुंरुद्कर म्हणाले, असं मुळीच नाही तर माझ्याइतका चांगलं बोलणारा महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही म्हणून मी इथे आहे. इतका आत्मविश्वास आणि शोभणारा अहंकार त्यांच्याकडे होता. त्यांच्याकडे नेहमीच शबनम असायची. खूप पोस्टकार्ड त्यांच्याजवळ असायची. वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या वाचकांना पत्रांची उत्तरं देत असायचे.

विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानत लोकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर अनेकांनी गिरीश कुबेर यांना प्रश्नं विचारले आणि त्याची समर्पक उत्तरं गिरीश कुबेर यांनी दिली. सभागृहाबाहेर कुरूंदकरांची सगळी पुस्तकं विक्रीसाठी ठेवली होती. त्या स्टॉलवरही लोकांची झुंबड उडाली होती आणि माझ्या अंदाजाप्रमाणे तिथे आणलेली सगळीच पुस्तकं संपली असावीत.

या प्रसंगी साधना-नरेश दधिच, दीपक पळशीकर, गीता भावसार, शिल्पा चौधरी, राजीव तांबे, किरण केंद्रे, असीम सरोदे, गिरीश कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, रेणुका माडीवाले, तन्मय कानिटकर यांची भेट झाली. कार्यक्रम संपल्यानंतर लोक मनापासून आयोजकांना धन्यवाद देत होते. चांगलं काहीतरी ऐकायला मिळालं असं समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होतं. असे कार्यक्रम वारंवार होण्याची सध्याच्या वातावरणात खूप गरज असल्याचं म्हणत श्रोत्यांनी परतीचा मार्ग पकडला.

शब्दांकन – दीपा देशमुख, पुणे