Sunday, March 26, 2023

अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश नाकारले : गिरीश कुलकर्णी

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी | समाजातील HIV बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचं मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलढण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते.

गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आम्ही HIV बाधित मुलांच्या विकासात शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिलं. जेवण, कपडे यात काही कमी अधिक झालं तरी चालेल पण शिक्षणाबाबत काहीही तडजोड केली नाही. मात्र, अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश दिले नाहीत. त्यामुळे अखेर आम्ही स्वतः विनाअनुदानित शाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. यामागे मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं हा मुख्य उद्देश होता. मुलांना शिक्षण देताना आम्ही बालककेंद्री शिक्षणावर अधिक भर दिला.”

- Advertisement -

वोपाच्या टीमने केलेल्या मदतीने शाळेतील मुलांना आनंदी बनवले आणि शाळेची गोडी लावली. याआधी ते शाळेपासून कारणं शोधून शाळेत येणं टाळायचं. मात्र, अभ्यासपूर्ण प्रशिक्षणामुळे मुलं आणि शिक्षकांमध्ये मित्रत्वाचं नातं तयार झालं, असंही गिरीश कुलकर्णी यांनी नमूद केलं.

अहमदनगर येथे झोपडपट्टी भागात धाडपडणाऱ्या एका शिक्षकांचं उदाहरण देत त्यांनी शाळेला कशाप्रकारे डिजिटल केलं याचाही उदाहरण दिलं. वोपाने मेहनत घेऊन अभ्यास करून काम केलं. तंत्रज्ञानावर पकड असलेल्या या टीमविषयी शिक्षकांमध्ये विशेष आवड आहे. त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर मुलांचे अभिप्राय देखील घेतले. या अभिप्रायातून आपलं काम तपासलं.”

सामाजिक संस्थांना महत्वाचा सल्ला

वोपा या संस्थेचं भविष्य खूप चांगलं असल्याचं सांगताना गिरीश कुलकर्णी यांनी स्वयंसेवी संस्थांना एक मोलाचा सल्लाही दिला. ते म्हणाले, “स्नेहालय एकाचवेळी अनेक विषय घेत मोठ्या प्रकल्पांवर काम करत आलं आहे. त्यात स्नेहालयला यशही येत गेलं. त्यातून अनेक प्रकल्प घेण्याचा विश्वास वाढला. मात्र, त्यामुळे कामावरील लक्ष विभाजित होतं. त्यातून कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो हा अनुभव आहे. म्हणूनच वोपाने आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी मोजक्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून काम करावं. ते नक्कीच एक आदर्श संस्था म्हणून पुढे येतील.”

“स्वयंसेवी संस्थांच्या रेट्याने अनेक चांगले कायदे आले”

स्वयंसेवी संस्थांच्या कामातून तयार झालेल्या दबावातून, रेट्यातून सरकारने अनेक कायदे केले. त्यामुळे समाजातील अनेक बदल शक्य झाले, असंही गिरीश कुलकर्णी यांनी नमूद केलं.

“स्वयंसेवी संस्थांमध्ये सर्व धर्माचं प्रतिनिधित्व असावं”

गिरीश कुलकर्णी म्हणाले, “संस्थांमध्ये पारदर्शकता असायला हवी. तेथे भारताचे चित्र दिसावे म्हणजेच सर्वधर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायला हवे. संस्थांच्या कारभाराला पुढील पिढीकडे देखील हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आणि संस्थांकडे कामासाठी निधीची कमतरता आहे, तर मोजक्या संस्थांकडे प्रचंड पैसा आहे. ही विषमता देखील कमी करणं आवश्यक आहे.”

शासन कमी पडते तेथे वोपासारख्या संस्थांची मोठी गरज : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी राम यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, “तरुणांमध्ये क्षमता आहेत, मात्र, या क्षमतांच्या विकासासाठी आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी काम करायला हवे. यासाठी सामाजिकदृष्ट्या संशोधन होणं देखील आवश्यक. काही ठिकाणी प्रशासन आणि शासन कमी पडते, अशावेळी वोपासारख्या स्वयंसेवी संस्थांची मोठी गरज आहे. वोपाचं काम महत्वाचं आहे. सर्व लोकांनी या कामात सहभागी व्हावे.”

वोपाकडून ‘शिक्षण आणि तरुणांचा विकास’ यावर भरीव काम सुरू आहे. व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी आणि तरुण महत्वाचा असतो. म्हणूनच त्यांच्या विकासासाठी व्यवस्थेत सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे, असंही नवल राम यांनी नमूद केलं.

“ग्रामीण भागात शिक्षणावर काम होणं अत्यावश्यक”

वोपाच्या वर्धापन कार्यक्रमात बोलताना बुलढाण्याचे शिक्षणाधिकारी शिवशंकर बाळसकारे म्हणाले, “ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात काम होण्याची गरज आहे. शहर आणि मोठ्या शाळांबाबत विशेष लक्ष दिले नाही तरी चालेल. मात्र दुर्गम ठिकाणी ग्रामीण भागात शिक्षणावर मूलभूत काम होणं आवश्यक आहे.”

यावेळी बाळसकारे यांनी शैक्षणिक संस्थांचे काम, शिक्षणावर होणारा कमी खर्च आणि मुलीची शाळेतील गळती यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “चांगलं काम करणाऱ्या संस्था नक्कीच आहेत. मात्र त्यांचं प्रमाण 30-35 टक्के इतकंच आहे. उरलेल्या 65 ते 70 टक्के शाळांवर काम करावं लागेल. दुसरीकडे शिक्षणावर अत्यंत कमी खर्च होत आहे. त्याचाही मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो आहे.”

“शाळांमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण चिंताजनक”

शाळांमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण मोठं असून ते चिंताजनक आहे. सरकारी यंत्रणा मुलांची गळती नाही असं सांगते. त्यासाठी प्रमाणपत्र देखील दाखवते. मात्र, मोठ्या प्रमाणात मुलं शाळांपासून दूर शेतात, दुकानात, घरात कामं करत आहेत.”

“शिक्षकांच्या यांत्रिक कामाला जिवंतपणा आला”

वोपाच्या कामाबद्दल बोलताना अनेक शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. आम्ही शिक्षक यांत्रिकपणे काम करत होतो. मात्र आता वोपाच्या प्रशिक्षणाने आमच्या कामात जिवंतपणा आला आहे. आम्ही यांत्रिकपणा टाळून मुलांशी आनंदाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.”