मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकराचा साखरपुडा झाल्याचं समजल्यानंतर मुंबईतील एका तरुणीने अंगावर रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतले आहे. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्वरित आग विझवून पीडितेला रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेत पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून 89 टक्के भाजल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
हि 21 वर्षीय तरुणी सांताक्रूझ येथील रहिवासी आहे. हि तरुणी तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये एका लग्नासाठी गेली होती. त्या ठिकाणी तिची एका तरुणाशी ओळख झाली. यानंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. दोघांचं बोलणं वाढलं. यातून दोघाचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनी लग्न करण्याचं देखील ठरवलं होतं. याबाबत त्यांनी आपल्या पालकांना प्रेमसंबंधाबाबत सांगितलं. पण संबंधित तरुण तरुणी दुरच्या नात्यानं एकमेकांचे भाऊ बहिण लागतात असं सांगून घरच्यांनी लग्नाला नकार दिला. यानंतर तरुणाच्या पालकांनी आपल्या मुलासाठी एक वेगळीच मुलगी शोधली आणि पीडितेला काही कळायच्या आत साखरपुडाही उरकला.
या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीनं आपल्या प्रियकराच्या घरी सात रस्ता याठिकाणी जाऊन गोंधळ घातला. त्यानंतर आरडाओरडा करत संबंधित तरुणी प्रियकारच्या घरात घुसली, घरातील रॉकेलचं कॅन घेत त्यातील रॉकेल अंगावर ओतून घेतलं. यानंतर पुढच्या क्षणात तरुणीनं स्वत:ला पेटवून घेतलं. तरुणीनं पेटवून घेतल्याची घटना घडताच आजूबाजूच्या लोकांनी त्वरित आग विझवली आणि तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दुर्दैवी घटनेत संबंधित तरुणी 89 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.