जीआयएस मॅपिंग पूर्ण; शनिवारपासून शहरात मालमत्तांचे सर्वेक्षण

औरंगाबाद – शहरातील मालमत्तांची नोंद महापालिकेने जीआयएस मॅपिंगव्दारे घेतली आहे. आता या नोंदीनुसार प्रत्यक्ष घरोघरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत. पहिल्या टप्यात प्रभाग तीन व चारमध्ये काम सुरू केले जाणार आहे. मालमत्ताधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी बुधवारी यांनी सांगितले.

महापालिकेने अनेक वर्षात शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केलेले नाही. चार वर्षांपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले पण हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत जीएसआय मॅपिंगव्दारे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम गुजराथच्या एमएक्स इन्फो या कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्पावर तब्बल दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यात एजन्सीने ड्रोनव्दारे छायाचित्र घेऊन नकाशे तयार केले आहेत. शहराचा एकूण परिसर १७० चौरस किलोमीटर आहे. त्यांपैकी 135 चौरस किलोमीटरचे छायाचित्र ड्रोनव्दारे काढण्यात आले आहेत. आता एक जानेवारीपासून महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्तांचे सर्वेक्षण करणार आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र फॉर्म तयार करण्यात आला आहे.

सर्व्हेक्षणासाठी स्मार्ट सिटीच्या लाइट हाऊस उपक्रमातील तरुणांची मदत घेतली जाणार आहे. या फॉर्ममध्ये विद्युत मिटर क्रमांक, आधारकार्ड, पॅननंबर, घराचे नळ कनेक्शन, मालमत्तेचा आकार, मालमत्ताधारकांचे मोबाईल नंबर, ई-मेल घेतले जाणार आहेत. ही सर्व माहिती मालमत्तेसोबत जोडण्यात येईल, असे अपर्णा थेटे यांनी सांगितले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला शहरातील मालमत्तांचे अद्ययावत रेकॉर्ड प्राप्त होणार आहे. महापालिकेकडे सध्या अडीच लाख मालमत्तांची नोंद आहे. त्यात भर पडून उत्पन्नात वाढ होईल, असाही दावा केला जात आहे.