Wednesday, February 1, 2023

रक्ताचा टिळा लावून केले प्रेमाचे नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार

- Advertisement -

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने विवाहित असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले आहेत. आरोपी तरुणाने लग्न झाल्याची माहिती तरुणीपासून लपवून तिला लग्नाचे आणि नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. अनैतिक संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं गर्भपात करण्यासाठी तरुणीवर दबाव आणला, त्याचबरोबर गर्भपात न केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव कामेश मरोठीया असे आहे. तो ठाण्यातील चिरागनगर परिसरात राहतो. आरोपी कामेशचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले असून तो एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. यादरम्यान त्याने 14 जून 2020 मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने या पीडित तरुणीशी जवळीक साधली. याच ओळखीतून आरोपीने पीडितेवर प्रेम असल्याचे भासवले. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांशी देखील ओळख वाढवली. पीडितेच्या वाढदिवशी आरोपीने तिला एकांतात भेटून स्वतःच्या रक्ताचा टिळा लावत आपले प्रेम व्यक्त केले. तसेच आजपासूनच आपण तुला बायको म्हणून स्विकारले अशी बतावणी करत आपण लग्न करू असे आमिषदेखील दाखवले.

- Advertisement -

यानंतर आरोपीने पीडितेला अनेकदा घरी बोलावून तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले.यामधून पीडित तरुणी गर्भवती राहिली. आता आपले बिंग फुटेल या भीतीने आरोपीने पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. तसेच भावाला ठार मारण्याची धमकीसुद्धा दिली. गर्भपात करण्यास सहमती मिळवल्यानंतर आरोपीने तिचा विश्वासघात केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने वर्तकनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार, धमकी आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कामेशला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.