काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३८ हजार महिलांवर अत्याचार झाले, १२ हजार दरोडे पडले. कायदा व सुव्यवस्था बिघडली. जीएसटी व नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था बिकट झाली. पेट्रोल, डिझेल वाढले. महागाईचा भडका उडाला. त्यामुळे राज्यात भाजप विरोधात लाट आली आहे. सांगली व कोल्हापुरला महापूर आला. नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने मदतीचा हात दिला नाही. दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. मदतीसाठी हे सरकार कधीही धावणारे नाही. महापुरावेळी नागरिकांनी बोटीची मागणी केली मात्र तत्काळ बोटी मिळाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांचे सहा दिवस हाल झाले. स्थानिक नागरिकांनी पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र सरकार याचे श्रेय घेत आहे. असा आरोप पाटील यांनी यावेळी सरकारवर केला.

अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी समन्वय असता तर इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती. महापुराच्यावेळी शासनाचे मंत्री सांगलीत आले त्यांनी नागरिकांची मदत केली नाही. तर मोबाईल, टीव्ही, गॉगलसह अनेक वस्तुंची खरेदी गेस्टहाऊसवर करत चैनी केली. हाताला मदत करून आपला कमळाबाईवरचा राग व्यक्त करावा व सात दिवस महापुरात झालेल्या त्रासाचा बदला घ्यावा, असे आवाहन जयंत पाटील केले.

Leave a Comment