सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तयार करत असताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा त्याग केला आहे. तरीही स्थानिक नागरिकांना टोलमध्ये माफी दिली जात नसल्याने तेथील स्थानिक ग्रामस्थ आनेवाडी टोल व्यवस्थापनाच्या विरोधात आक्रमक झाले असून टोलनाका परिसरातील ग्रामपंचायत पोलिसांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे.
स्थानिकांना टोल माफी देण्यात यावी अशी मागणी वारंवार स्थानिक शेतकरी करत आहेत. आनेवाडी टोलनाक्याच्या वापर तेथील स्थानिक गावकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. ग्रामस्थांना टोलनाक्याच्या परिसरात जवळची बाजारपेठ म्हणजे भुईंज, पाचवड असून या ठिकाणी जायचं म्हटलं तरी टोल द्यावा लागत आहे. स्वतःच्या शेतात जायचं म्हणलं तरी त्यांना टोल द्यावा लागत आहे यावर शेतकरी संतपला आहे. यामुळे स्थानिकांना टोल माफी द्यावी या मागणीचे निवेदन पोलीस ठाण्याचे अधिकारी रमेश गरजे यांना देण्यात आले आहे..
यावेळी दरेखुर्द ,सायगाव ,पवारवाडी रायगाव, आणेवाडी, पाचवड, गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थांनी येत्या २ एप्रिलला याप्रकरणी मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. तसेच यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या टोलमाफीच्या मागणीला यश मिळते का ते आता पाहावं लागेल.