सातारा | बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर लोणंद व कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बकरी बाजारात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. बाजार समितीला जत्रा भरल्याचे स्वरूप आले होते. बाजारात विक्रमी कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली. यावेळी कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडविण्यात आले, मात्र गर्दीच्या या ठिकाणांवर कारवाई केली करण्यासाठी प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याचे पहायला मिळाले. लोणंद व कराडला रेकाॅर्ड ब्रेक गर्दी बाजार समितीच्या आवारात झालेली असताना कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
लोणंद बाजार समितीच्या जनावरे बाजारात पहाटे पाचपासून बाजार आवारावर दुचाकी, चारचाकी व ट्रकमधून शेळी, मेंढी, बकरी व बोकड यांची आवक झाली होती. त्यामुळे बाजारात बकरी व बोकडांची सुमारे पाच, दहा, पंधरा ते वीस हजारापर्यंत विक्री झाली होती. एका बोकडाची किंमत तर एक लाखापेक्षा जास्त गेली होती. बाजारात सुमारे तीन ते चार कोटींची उलाढाल होणार असल्याचे लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी सांगितले.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/349716893497042
आजच्या बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक, गोवा राज्यासह हुबळी, घारवाड, बेंगलोर, कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील सुमारे पंधरा ते वीस हजार खरेदीदार आले होते. त्यांच्या वाहनांची संख्याही मोठी होती. दरम्यान, या उलाढालीतुन बाजार समितीला चांगला कर जमा होईल, असे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी सांगितले.
कराडला पोलिसांनी गर्दी पागवली
बकरी ईदपूर्वीचा गूरूवारचा हा शेवठचा बकरी बाजार असल्याने कराड येथील बैल बाजार रोडवर सकाळपासून मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करीत गर्दीला पांगवत बंदोबस्त तैनात करावा लागला. कोरोनामुळे बैलबाजार स्थळावर सध्या बाजार भरवण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गूरुवार आठवडी बाजार भरला नसला तरी या परिसरात सकाळी बकरी विक्रेते व खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण रस्ता गर्दीने फुलून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शहर पोलिस तसेच वहातूक पोलिसांनी बैलबाजार रोडवर धाव घेत गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करीत वहातुक सूरळीत केली. या रोडवर तसेच कल्याणी मैदानावर ही खरेदी-विक्री करणार्यांनी गर्दी केली होती.
कराडला सव्वा लाखाचा बकरा
बकरी ईद येणार्या बुधवारी साजरी होत आहे.त्यासाठी आज रोडवर भरलेल्या बकरी बाजारात लाखोंचा उलाढाल झाली.एक बकरा तब्बल सव्वा लाख रूपयांना आज विकला गेला. पाच हजारापासून लाखाच्या वर बकर्यांची किमत गेली होती.परजिल्ह्यातून ही बकरी विकण्यासाठी आणण्यात आली होती. कल्याणी मैदानावर ही बकरी विक्रेत्यांसह खरेदीदारांनी गर्दी केली होती.