परभणी – जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या काही गावांत अचानक गूढ आवाज येऊन जोराचे हादरे बसले. यामुळे नागरिकांत मोठी घबराट निर्माण होऊन भूकंप असल्याचे मानून अनेकांनी आपले घर सोडून पळ काढल्याची घटना गुरुवारी घडली. यामुळे सोनपेठ तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठी असणारे विटा, वाघलगाव, वाणीसंगम, दुधगाव आदी गावांत गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक भूगर्भातून मोठा गूढ आवाज स्थानिक नागरिकांना ऐकायला मिळाला. घरातील भिंती आणि दरवाजे, खिडक्या हादरत असल्यामुळे अनेकांनी आपल्या मुलाबाळांना घेऊन खुल्या मैदानात धाव घेतली. यावेळी अनेकांना हा भूकंप असल्याचा भास झाला तर अनेकांना या विचित्र आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हा आवाज सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावासह पाथरी तालुक्यातील देखील गोदाकाठावर असणाऱ्या काही गावांत देखील हा गूढ आवाज ऐकायला मिळाल्याची चर्चा होत होती.
सोनपेठ तालुका व परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे उत्खनन होत असल्यामुळे भूगर्भात त्याचा उलट परिणाम होत असल्याचे मत जुन्या जाणकार मंडळींनी व्यक्त केले आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होतो. तसेच अनेक ठिकाणी असणाऱ्या डोंगरांना पोखरून मुरूम उत्खनन होत आहे. तसेच सध्या सर्वत्र बांधकाम चालू असून प्रत्येकजण बोअरवेल पाडत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची हानी होत असल्यामुळेच भूगर्भात आमूलाग्र बदल होत असल्याचे मत जुनी जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.