औरंगाबाद – समाजाच्या सहभागातून गोगा बाबा टेकडी हिरवीगार करण्यात येणार आहे. या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाने किमान दोन वृक्ष लागवड करून संवर्धन करावेत. यातून गोगा बाबा टेकडी परिसर ऑक्सिजन हब होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.
हरित गोगाबाबा टेकडी करण्यासाठी वृक्ष संवर्धन, रोपन व्हावे म्हणून मराठवाडा इको बटालियनला क्रेडाईतर्फे जवानांना राहण्यासाठी कंटेनर केबिन भेट स्वरूपात देण्यात आली. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते फीत कापून कंटेनर केबिनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बटालियनच्या माध्यमातून टेकडी परिसर संपूर्णतः हिरवागार करण्यासाठी जवान मेहनत घेत आहेत. मराठवाड्याचे जंगल क्षेत्र वाढविण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले. तसेच क्रेडाईचे आभारही मानले
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून टेकडी परिसर हिरवागार करण्यात येत आहे. या उदघाटनप्रसंगी श्रीमती कंचन चव्हाण, कर्नल एम.ए. खान, सुभेदार राजेश गाडेकर चव्हाण, क्रेडाईचे नितीन बगडिया, जबिंदा आदींची उपस्थिती होती.