Wednesday, February 1, 2023

लग्नात नवरी-नवरदेवासोबत फोटो काढणं महिलेला पडले महागात; 14 तोळे सोने असलेली पर्स चोरट्याने पळवली

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील पंकज हॉटेलमध्ये सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून एका महिलेचे सुमारे पाच लाख रूपये किमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सविता सुधीर पाटील (वय 41, रा. वारूंजी, विमानतळ ता. कराड) यांनी रात्री उशिरा शहर पोलिसात दिली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सविता पाटील यांच्या नातेवाईकाचा साखरपुड्याचा कार्यक्रत येथील पंकज हॉटेलमध्ये होता. सविता पाटील ह्या दुचाकीवरून त्यांच्या मुलासोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या व ब्रेसलेट पर्समध्ये काढून ठेवल्या. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या नणंदेची मुलगी ऋतुजा साळुंखे हिने सविता यांच्याजवळ तिच्या भावाची जुनी अंगठी पर्समध्ये ठेवायला दिली. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम झालेनंतर दुपारी 1.30 च्या सुमारास सविता पाटील यांनी त्यांची पर्स शेजारच्या सोफ्यावर ठेवून फोटो काढण्यासाठी गेल्या. फोटो काढून झाल्यानंतर पर्स घेण्यासाठी गेल्या असता पर्स त्याठिकाणी दिसली नाही. पर्सबाबत पाटील यांनी पै पाहुण्यांना विचारणा केली असता त्यांनी काही माहिती नसलेबाबत सांगितले.

यावरून त्यांची खात्री झाली की पर्स अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. त्यामध्ये त्यांचे सुमारे 4 लाख 20 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या 6 बांगड्या, 35 हजार रूपये किमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 25 हजार रूपये किमतीचे 7 ग्रँम वजनाची अंगठी असा सुमारे 4 लाख 80 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली. सविता पाटील यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group