Gold Rate : सोन्याच्या किमतीत सध्या जोरदार तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर सतत नवीन उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे एकच प्रश्न सध्या चर्चेत आहे – या वर्षी सोनं 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचणार का?
आताचा दर आणि आवश्यक वाढ (Gold Rate)
सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 84,650 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी सोन्याला फक्त 13.5 टक्के वाढ आवश्यक आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, भूराजकीय तणाव आणि डॉलरमधील अस्थिरता पाहता, सोनेदार भविष्याची चिन्हं दिसत आहेत.
10 वर्षांत सोन्याची प्रचंड झेप (Gold Rate)
गेल्या दशकात सोन्याच्या (Gold Rate) किमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. 2011 मध्ये सोनं 25,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं, तर 2020 मध्ये ते 50,000 रुपये पार करुन नवे उच्चांक गाठले. विशेष म्हणजे 25 हजार ते 50 हजार पोहोचायला 108 महिने लागले, पण त्यानंतरचा प्रवास अधिक वेगवान ठरला. 50 हजारावरून 75 हजारापर्यंतचा टप्पा फक्त 48 महिन्यांत पूर्ण झाला. 2024 च्या सप्टेंबरमध्ये सोनं 75 हजारांवर पोहोचलं आणि आता 84,650 रुपयांवर आहे.
तज्ज्ञांचे मत काय? (Gold Rate)
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार एका ज्वेलरीचे एमडी कॉलिन शहा यांच्यानुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी वाढली आहे. भूराजकीय तणाव, अमेरिकन टॅरिफ आणि मंदीची भीती यामुळे 2025 मध्ये सोने नवे उच्चांक गाठू शकते.
मात्र, ऑग्मोंट रिसर्च हेड डॉ. रेनीशा चैनानी यांचे मत थोडं वेगळं आहे. त्यांच्या मते, सध्या बाजारातली बरीच अनिश्चितता आधीच किंमतींमध्ये समाविष्ट झाली आहे. त्यामुळे या वर्षी सोनं 1 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे. पण 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर जागतिक तणाव, टॅरिफ वॉर किंवा युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास सोन्याला 1 लाख रुपयांचा टप्पा गाठायला वेळ लागणार नाही.
डॉलरमध्येही सोन्याचा झपाटा
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने नवे उच्चांक गाठत आहे. सध्या अमेरिकन बाजारात सोनं $2,914 प्रति औंस दराने व्यवहार करत आहे, जे साधारणपणे $1,027 प्रति 10 ग्रॅम होते. भारतात सध्याच्या डॉलर-रुपया विनिमय दरानुसार हे जवळपास ₹89,400 प्रति 10 ग्रॅम बसते. तज्ज्ञांच्या मते, जर सोने $3,000 प्रति औंस गाठलं, तर ते पुढे आणखी उंचावण्याची शक्यता आहे.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवर नजर
सोन्याच्या भविष्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्हचं धोरणसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. फेडने अलीकडेच व्याजदरात 1% कपात केली होती, मात्र त्यानंतर दर स्थिर ठेवले आहेत. जर अमेरिकेत महागाई वाढली तर फेड पुन्हा व्याजदर वाढवू शकते. अशा परिस्थितीत डॉलर मजबूत होईल आणि सोन्याच्या किमतीवर थोडासा दबाव येऊ शकतो.
म्हणूनच, सोन्याच्या किमती कधी कुठे जातील हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला असलेली मागणी आणि बदलते जागतिक घटनाक्रम पाहता, 2025 पर्यंत सोन्याचा नवा इतिहास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.