कराड | गोंदी येथील ग्रामपंचायत निवडणूक वीस वर्षानंतर अतुल भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली बिनविरोध झाली. तेथील सरपंचपद खुले असल्याने रस्सीखेच होती. मात्र गावकऱ्यांचे एकमत व स्थानिक नेते मंडळींची एकजूट झाल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. लोकनियुक्त सरपंचपदी निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुबराव पवार हा सुशिक्षित, उत्साही व तरुणांचे कल्याण करणारा चेहरा मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
गावात दिवंगत स्वातंत्र्य सैनिक तसेच भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान, राज्य प्रशासन व निमशासकीय क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या युवकांची संख्या जास्त आहे. याबरोबर इंद्रायणी सुवासिक तांदळाचे उत्पादन घेणारे गाव अशीही ख्याती आहे. गावच्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्याबरोबर लोकनियुक्त सरपंचपद खुले आल्याने इच्छुकांनी गर्दी केली होती. सरपंच पदासाठी निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुबराव पवार यांच्या नावाबाबत गावकऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. त्यामध्ये गावकऱ्यांनी श्री. पवार यांना प्रथम पसंती दिल्याने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध करण्याचा स्थानिक नेतेमंडळींनी चंग बांधला.
बिनविरोध निवडणुकीबाबत ग्रामस्थांचे एकमत पाहून सरपंच व सदस्य निवडीत अपवाद वगळता यश आले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज असलेल्या इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखवत गावकऱ्यांच्या एकीला बळ देण्याचा निर्णय घेत त्यांनीही माघार घेतली. यातून सरपंच व सर्वच्या सर्व नऊ सदस्य बिनविरोध झाले. त्यांचे मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, विनायक भोसले यांनी अभिनंदन केले. बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदी सुबराव पवार, सदस्यपदी शरद पवार, वैशाली यादव, वनिता पवार, रमेश पवार, अरुणा माने, अजित कुंभार, रमेश पवार, जयाताई मदने, प्रज्ञा बनसोडे यांची वर्णी लागली.
सुबराव पवार लोकनियुक्त बिनविरोध सरपंच
गावच्या विकासासाठी पक्ष विरहीत विचार ठेवून काम करणार आहे. गावचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास राहील. यामध्ये कोणताही भेदभाव ठेवणार नाही. गोदी ही आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा आमचा प्रयत्न राहीलस असे प्रतिपादन लोकनियुक्त बिनविरोध सरपंच सुबराव पवार यांनी केले.