कोरोनामुळे खाजगी रुग्णालयांना अच्छे दिन! खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंगवर तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाजगीत हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंग… तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

औरंगाबाद प्रतिनिधी | गेल्यापाच महिन्यांपासून अतिश्रमाने थकलेला स्टाफ, रुग्णांची हेळसांड, असुविधांनी घेरलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवत कोरोना रुग्ण आता खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. महिनाभरापूर्वी पर्याय नसल्यामुळे घाटी, मेल्ट्रोन अथवा जिल्हा रुग्णालयाची पायरी चढणारे रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या खासगी रुग्णालयांचा बॅकलॉग आता भरून निघत आहे. स्लम भागानंतर मध्यमवर्गीयांवर हल्ला करणाऱ्या कोरोनाने आता उच्च उत्पन्न गटाकडे मोर्चा वळवला आहे. व्यापारी, नोकरदार त्याचबरोबर शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर संसर्गाच्या विळख्यात सापडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला आहे.

विभागीय आयुक्तालयातील उप आयुक्तांसह, तहसीलदार तर आरोग्य उपसंचालक कार्यालय, घाटी, मनपातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी संक्रमित झाले आहेत.महिनाभरापासून उच्चभ्रू वसाहतीत मोठ्या प्रमाणावर लागण होत आहे. गारखेडा परिसरातील सह्याद्री हिल्स कॉलनीत गेल्या आठवडाभरात तब्बल दहा पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. तर दशमेश नगर, सुराना नगर, टाऊन हॉल, सहकार नगर, नारळीबाग, सिडको -एन, विश्व भारती कॉलनी, खिंवसरा पार्क यासह इतर उच्चभ्रू वसाहतींना विळखा घातला आहे.

रुग्णांचा ओढा खाजगीकडे !
दरम्यान गेल्यात दोन तीन महिन्यात अल्प उत्पन्न तसेच मध्यमवर्गीय रुग्णांची मोठी संख्या होती. या सर्व रुग्णांनी मनपा अथवा सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. संसर्ग उच्च उत्पन्न गटाकडे सरकल्याने आता खाजगी हॉस्पिटलकडे ओढा वाढल्याचे लक्षात येते. शहरातील प्रमुख एमजीएम, सेठ नंदलाल धूत, कमलनयन बजाज, हेडगेवार रुग्णालय यासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये बेड फुल झाले आहेत. आयसीयू रिकामे नाहीत, त्याचबरोबर ऑक्सिजनची सुविधाही मर्यादितच आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने आता खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण वेटिंगवर आहेत.

घाटी रुग्णालय – ४५६ बेड ,मेल्ट्रोन केअर सेंटर – २५० बेड,जिल्हा रुग्णालय – २०० असे असताना खाजगीकडे ओढा का !
कोरोना उपचारात आयसीयू व्यवस्था, ऑक्सिजन बेड यासह इतर उपचार महत्त्वाचे मानले जातात. जसे दररोज अंघोळीसाठी गरम पाणी, वाफ घेण्याची सुविधा, बाथरूम, शौचालयाची व्यवस्था या बाबीही पेशंट तपासून बघतात. यामुळेच खाजगी हॉस्पिटल ला रुग्ण प्राधान्य देताना दिसतात.

सरकारी बाबत तक्रारी !
जिल्हा रुग्णालयात गरम पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बाथरूम मध्ये बाटली, साबण अशा छोट्या गोष्टी आवश्यक असतात. त्याचाही तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनसाठी रुग्णांना या बेडवरून दुसऱ्या बेडवर नेले जाते. असेही प्रकार घडत असल्याने रुग्णांनी जिल्हा रुग्णालयाला नाकारले आहे. त्यामुळे तिथे अजून बेड रिक्त आहेत. घाटी रुग्णालयावर जास्तीचा भार असल्याने तिथेही रुग्ण जाण्यास का-कू करतात. मुख्यमंत्र्यांनी थाटात उद्घाटन केलेल्या मेल्ट्रोन केअर सेंटरची अवस्था फारशी बरी नाही. अशा परिस्थितीत खाजगी रुग्णालयांना मात्र आता अच्छे दिन आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद तर खासगी रुग्णालयांचा नकार कक्ष कोरूना योद्धे संसर्ग जास्त होत असल्याचे लक्षात येतात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद
तर खासगी हॉस्पिटलचा नकार कक्ष !
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनाग्रस्त रुग्ण अथवा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून अडचणी सोडविण्यासाठी प्रतिसाद कक्षाची स्थापना केली आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन सकारात्मक पावले उचलत असताना खाजगी रुग्णालयांनी मात्र नकार कक्ष स्थापन केल्याचे दिसते. आयसीयू नाही, बेड फुल अशी कारणे देऊन रुग्णांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. आज प्रत्येक रुग्णालयात २० ते ३० रुग्ण वेटिंगवर आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment