उन्हाळ्याच्या सुमारास प्रवाशांची गर्दी अधिक होण्याची शक्यता लक्षात घेत, मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. यात १,२०४ विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये २९० अनारक्षित आणि ४२ वातानुकूलित गाड्या आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत, विशेषतः भिवंडी आणि ठाणे परिसरातील नागरिकांना.
भिवंडी आणि ठाणे येथून सध्या सहा अतिरिक्त अनारक्षित रेल्वेगाड्या धावणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, भिवंडी – सांकराईल मार्गावर दर बुधवारी रात्री १०.३० वाजता ०११४९ गाडी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सांकराईल माल टर्मिनलवर दुपारी १ वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, नागपूर, रायपुर, बिलासपूर आणि खडगपूर इत्यादी स्थानकांवर थांबा मिळणार आहे.
तसेच, ठाणे – खडगपूर मार्गावर विशेष रेल्वेगाडीची तीन फेऱ्या १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान चालवण्यात येणार आहेत. ही गाडी दर शनिवारी रात्री ११.४५ वाजता खडगपूर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ठाणे पोहोचेल. यामध्ये १० सामान्य द्वितीय श्रेणी डबे, २ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन असतील.
तसंच, मुंबई – करमळी दरम्यान वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी गाडी ११ एप्रिलपासून प्रत्येक शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी करमळी पोहोचेल. करमळी – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी १२ एप्रिलपासून प्रत्येक शनिवारी करमळीहून दुपारी २.३० वाजता सुटेल. या गाड्या विविध प्रमुख स्थानकांवर थांबतील आणि प्रत्येक गाडीत २० एलएचबी डबे असतील.
प्रवाशांसाठी ही सुविधा ८ एप्रिलपासून सुरू झाली असून, तिकिटे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तसेच पीआरएस यंत्रणेद्वारे उपलब्ध असतील.