औरंगाबाद – इंडिगो एअरलाइन्सचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई हे विमान 5 ऑक्टोबर पासून दररोज उड्डाण घेणार आहे. अशी माहिती उद्योजक आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सूनित कोठारी यांनी दिली आहे.
पर्यटन, औद्योगिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातून सध्या इंडिगो आणि एअर इंडियाच्या माध्यमातून दिल्ली मुंबई आणि हैदराबाद साठी विमानसेवा सुरू आहे. ही विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस आहे. परंतु, आता रोज विमान उड्डाण घेणार आहे. याचा फायदा उद्योजक, पर्यटक आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. कोरोना प्रादुर्भावापूर्वी औरंगाबादहुन बेंगरूळ आणि अहमदाबाद साठी विमानसेवा सुरू झाली होती. परंतु कोरोना महामारी मुळे ही सेवा बंद करण्यात आली होती.
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगरूळ अशी कनेक्टिव्हिटी पुन्हा वाढली, तर याचा लाभ दक्षिण भारतात ये-जा करणाऱ्या आयटी क्षेत्रातील तज्ञ, विद्यार्थी, उद्योजक, तसेच व्यावसायिकांना होणार आहे.