मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. सध्या मुंबईच्या दळणवळणामध्ये लोकलची भूमिका मुख्य असली तरी आता इतरही अनेक मार्ग उपलब्ध होत आहे. त्यामध्ये मुख्यतः मेट्रोचा समावेश आहे बस,टॅक्सी सेवेचा समावेश आहे आणि आता मुंबईतल्या काही भागांसाठी जेट्टीची आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. होय आम्ही बोलत आहोत डोंबिवलीकरणबद्दल… डोंबिवलीतून आता थेट ठाणे, नवी मुंबई आणि वसई विरार या ठिकाणी जलमार्गाने प्रवास करता येणार आहे. डोंबिवली वरून या ठिकाणी प्रवास करण्यासाठी लवकरच रो रो सेवा सुरू होणार आहे. डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव परिसरातील गणेश घाटावर काल (19) जेट्टीच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.
याबाबत माहिती देताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, जेट्टीच्या कामासाठी 22 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. लवकरच या मार्गाने जलवाहतूक सुरू होईल. विशेष म्हणजे वाहनांसह ठाणे, नवी मुंबई आणि वसई विरार येथे जाणं शक्य होणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठता येणार
मिळालेल्या माहितीनुसार जेट्टीच्या कामाला सुरुवात होऊन लवकरच हा जलवाहतुकीचा मार्ग सुरू होणार आहे. या जलवाहतूक मार्गाने नवी मुंबईला जाऊन आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठता येणार आहे त्याबरोबरच ठाणे वसई विरार देखील गाठता येणार आहे. या रो रो बोट ने वाहन घेऊन जाता येणार आहे. या जलवाहतूक मार्गामुळे रोजगारही उपलब्ध व्हायला मदत होणार आहे.
कधी सुरू होणार सेवा?
डोंबिवली मोठागाव गणेश घाट इथे तिकीट घर आणि पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जेट्टीमुळे परिसरातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जेट्टी बांधण्याचे काम इथे अठरा महिन्यात पूर्ण केलं जाणार आहे 18 महिन्यानंतर रो रो बोट सेवा कार्यान्वित होणार असल्याचं जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं
खरंतर 2018 साली तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह या जलवाहतूक मार्गाची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन जलवाहतूक मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक घेतली होती. नितीन गडकरी यांनी या जलवाहतूक मार्गासाठी एक हजार कोटींचा निधीही मंजूर केला. कोविड काळामुळे जलवाहतूक मार्गाचे काम होऊ शकलं नाही पण आता डोंबिवली मोठा गाव गणेश घाटावर जेट्टी बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच आता मुंबईकरांची चांगली सोय होणार आहे.